मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे नावे एकसंदेश दिला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनावर काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सडकून टीका केली आहे. दिवे लावणे, घंटानाद, थाळीनाद करायला सांगणे हे काय देशाच्या पंतप्रधानाचं काम आहे का? असा संतप्त सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.


बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाचं संकट अतिशय गंभीर होत चाललं आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यात पंतप्रधान कधी टाळ्या वाजवायला सांगतात तर कधी दिवे लावायला सांगतात. लोकांना असं आवाहन देणे हे पंतप्रधानांचं काम आहे का? नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखं कधी बोलणार आहेत का? देशाच्या हिताचे निर्णय घेणार आहेत का?


आज देशभर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोकांना धीर देणे, मेडिकल साहित्य पुरवणं याकडे पंतप्रधानांनी लक्ष दिले पाहिजे. राज्यांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. आता तरी त्यांनी थोडं गंभीर व्हायला पाहिजे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की 5 एप्रिलला आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं मोदी म्हणाले.


संबंधित बातम्या