नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 5 एप्रिल, रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं मोदी म्हणाले.


हे आयोजन करताना कुणीही एकत्र यायचं नाही. रस्त्यावर, गल्लीत एकत्र जमायचं नाही, असं मोदी म्हणाले. यावेळी मोदी म्हणाले की, 22 मार्चला देशवासियांनी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती केलेल्या धन्यवादाचे अनेक देश अनुकरण करत आहेत. यावेळी देशाच्या सामूहिक शक्तीचं दर्शन आपण दाखवलं. देश एक होऊन कोरोना विरोधात लढाई लढतोय. लोकडाऊनच्या काळात आपण आपण एकटे नाहीत. 120 कोटी देशवासियांची ताकत आपल्या सोबत आहेत, असं मोदी म्हणाले.

ते म्हणाले की, या कोरोना महामारीच्या अंधकारात आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या महामारीने सर्वाधिक गोरगरीब प्रभावित झाले आहेत. या कोरोना संकटाच्या अनिश्चिततेला संपवून आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवायचं आहे. 5 एप्रिलला आपल्याला कोरोनाच्या संकटाळा महाशक्तीचं जागरण करायचं आहे. 5 एप्रिल रविवारी रात्री 9 वाजता आपल्याला 9 मिनिटं मला हवी आहेत. 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल, असं मोदी म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, या आयोजनाच्या वेळी कुणीही एकत्र यायचं नाही. रस्त्यावर, गल्लीत एकत्रित जमा व्हायचं नाही.सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन ही गोष्ट करायची आहे. आपल्या दारात, बाल्कनीत उभं राहून हे करायचं आहे, असं मोदी म्हणाले.

यावेळी ते म्हणाले की, देशातील कोट्यवधी लोक आज घरात आहेत. ते विचार करत असतील की एवढी मोठी लढाई आपण एकटं कसं लढू. लॉकडाउन असलं तरी कोणीही एकटं नाही. 120 कोटी लोकांची सामूहिक शक्ती एकत्र आहे. वेळोवेळी या सामूहिक शक्तीच्या भव्यतेचं दर्शन घडवणं आवश्यक आहे. या महामारीमुळे पसरलेल्या अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. ज्यांच्यावर जास्त संकट आलंय अशा गरीब बांधवांना आपल्याला सोबत पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला कोरोना संकटाला हरवायचं आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्वच राज्य सरकारांकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदी वेळोवेळी देशवासियांचा संबोधित करत असतात.  सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे. देशात अडीच हजाराहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. तर 50 हून अधिक जणांचा बळी गेला आहे.

काल केल्या होत्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना

काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचं संकट हे युद्धापेक्षा मोठं असल्याचंही म्हटलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? याच्या सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या होत्या. लॉकडाऊन संपविल्यानंतर 15 एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती भाग सुरु होतील हे पाहावे, असं मोदी म्हणाले होते.

देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होत आहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आत्ता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे संकट टळले नाही. आपल्याला सोशल डिस्टनसिंग किंवा सामाजिक अंतर राखायचे आहे. त्यासाठी मास्क वापरले पाहिजे किंवा घरगुती स्वच्छ कपड्याचा मास्क म्हणून उपयोग करू शकतो. 21 दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका, असंही मोदी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये म्हटले होते.