पोटात 10 कोटींचं ड्रग्ज, अफगाणी टोळीचा पर्दाफाश
एक आठवडा रुग्णालयात राहिल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करुन रहमतुल्लाहच्या पोटातून 28 कॅप्सूल, फैजकडून 38, हबीबुल्लाह आणि वदूद या दोघांकडून 15, अब्दुल हमीदकडून 18, फजल अहमदकडून 37 आणि नूरजई कबीरच्या पोटातून 26 कॅप्सूल जप्त केल्या आहेत.
नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधून दिल्लीत ड्रग्ज (हिरोईन) आणणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. आरोपी ड्रग्ज असलेल्या कॅप्सूल पोटात लपवून आणत होते. याच्या मोबदल्यात त्यांना लाखो रुपये मिळत होते. परंतु गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या मदतीने सात अफगाणिस्तानच्या नागरिकांना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. या टोळीतील प्रत्येकाचा पोटात 20 ते 40 कॅप्सूल होत्या. सात जणांच्या पोटातून एकूण 177 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. जप्त केलेल्या ड्रग्जची एकूण किंमत जवळपास दहा कोटी रुपये आहे. आणखी दोन जणांनाही (रिसिव्हर्स) अटक केली आहे. हे सर्व आरोपी भारतातच राहतात, त्यांना 'कुरिअर्स' म्हटलं जातं.
10 डझन केळी खायला दिल्यानंतर कॅप्सूल बाहेर काढले! अंमली पदार्थ नियंत्रण अन्वेषण विभागाने सर्व आरोपींना पकडलं. संशय आल्याने त्यांच्या तपासणीसाठी थांबवण्यात आलं. सामानात काहीही न मिळाल्याने त्यांना स्कॅनिंग आणि एक्स-रेसाठी पाठवलं. अहवाल धक्कादायक होते. या सगळ्यांच्या पोटात ड्रग्ज असलेल्या कॅप्सूल दिसल्या. त्या काढण्यासाठी एनसीबीने आरोपींना तब्बल 10 डझन केळी खाऊ घातली.
या गोळ्या त्यांच्या पोटात कशा गेल्या याची माहितीही टोळीतल्या लोकांनी दिली. त्यांच्या माहितीनुसार, मध आणि एका विशेष तेलाच्या मदतीने त्यांच्या पोटात गोळ्या टाकल्या. हे लोक अफगाणिस्तानमधून दिल्लीपर्यंत उपाशीपोटी आले होते. सर्व 177 कॅप्सूल हॉटेलमध्ये जाऊन काढायचा त्यांचा प्लॅन होता.
युसूफजाई रहमतुल्लाह, फैज मोहम्मद, नबीजादा हबीबुल्लाह, अहमदी अब्दुल वदूद, टर्कमन अब्दुल हमीद, फजल अहमद, नूरजई कबीर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर दिल्लीत राहणाऱ्या हयातुल्लाह आणि मसूर मोहम्मद यांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
एक आठवडा रुग्णालयात राहिल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करुन रहमतुल्लाहच्या पोटातून 28 कॅप्सूल, फैजकडून 38, हबीबुल्लाह आणि वदूद या दोघांकडून 15, अब्दुल हमीदकडून 18, फजल अहमदकडून 37 आणि नूरजई कबीरच्या पोटातून 26 कॅप्सूल जप्त केल्या आहेत.