जाको राखे साइयां, मार सके न कोई... 13 वर्षांच्या मुलीनं प्रसंगावधान दाखवत वाचवला स्वतःचा जीव; नेमकं घडलं काय?
13 वर्षांच्या मुलीचं प्रसंगावधान... धैर्य दाखवत वाचवला स्वतःचा जीव. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींच्या शोध सुरू केला आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली येथे एका व्यक्तीनं त्याच्यासोबत राहणारी महिला आणि तिच्या दोन मुलांपासून सुटका करण्यासाठी मोठं पाऊल उचललं. त्यानं रात्रीच्या वेळी महिला आणि तिच्या दोन मुलांना फसवून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर नेलं आणि लक्ष चुकवत तिघांनाही धक्का दिला. महिला आणि तिची दोन्ही मुलं नदीत पडली. या प्रकरणात एका 13 वर्षाच्या मुलीचं प्रसंगावधान आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी दाखवलेली तत्परता यामुळे एका 13 वर्षीय मुलीचा जीव वाचला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींच्या शोध सुरू केला आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली येथील पुप्पाला सुहासिनी (वय 36) मतभेदांमुळे पतीपासून विभक्त झाली होती. मजुरी करून ही महिला आपली मुलगी कीर्तनासोबत राहू लागली. यादरम्यान तिची ओळख दोन वर्षांपूर्वी प्रकाशम जिल्ह्यातील दर्शी येथील उलवा सुरेशसोबत झाली. पुढे सुहासिनी सुरेशसोबक राहू लागली. यानंतर सुहासिनीलाही मूल झालं. जर्सी (वय एक वर्ष) असं त्याचं नाव. पण कालांतरानं सुरेश आणि सुहासिनी यांच्यातही मतभेदही होऊ लागले. त्यानंतर सुरेशनं सुहासिनी आणि तिच्या मुलांपासून सुटका करुन घेण्याचा कट रचला आणि त्या तिघांच्या हत्येचा कट रचला.
नेमकं काय घडलं?
शनिवारी संध्याकाळी सुरेश महिला आणि दोन मुलांना कपडे खरेदी करण्यासाठी गाडीतून घेऊन गेला. ते चौघेही राजमहेंद्रवरम येथे गेले. रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरुन रविवारी पहाटे 4 वाजता आरोपीनं महिला आणि मुलांना रावुलपालम येथील गौतमी जुन्या पुलावर (गोदावरी नदीवरील पूल) आणलं. त्यानं तिला तिथे सेल्फी घेण्यास सांगितलं. सुहासिनी आणि तिच्या दोन मुलांना भिंतीवर उभं केलं. त्यानंतर संधी साधत त्यानं महिला आणि मुलांना नदीत ढकलून दिलं आणि तात्काळ तिथून पळ काढला. सुहासिनी आणि एक वर्षाचा जर्सी नदीत पडला, मात्र कीर्तनानं पुलाच्या बाजूला असलेला केबलचा पाईप पकडला. एका हातानं पाईप धरून ती कोणीतरी वाचवा वाचवा, असं ओरडू लागली.
अशा परिस्थितीतही किर्तनानं धैर्य दाखवून स्वतःचे प्राण वाचवलं. खिशात मोबाईल असल्याचं तिला आठवलं. एका हातानं पाईप धरून हळूच दुसऱ्या हातानं मोबाईल बाहेर काढला. लगेच पोलिसांना बोलावलं. त्यांनी रावुलापलेम एसआयला फोन केला. वेंकटरामन कर्मचाऱ्यांसह पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी मुलीची सुखरूप सुटका केली.