यापुढे ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली, त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद ठेवा : बबनराव तायवाडे
Babanrao Taywade : ओबीसींच्या विरोधात बोलल्यास जरांगे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचे तायवाडे म्हणाले.
हिंगोली : यापुढे ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली, त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यात ठेवा, असे वक्तव्य ओबीसी नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी केले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. यासाठी आज हिंगोलीत (Hingoli) ओबीसी मेळावा झाला. दरम्यान, यावेळी बोलतांना बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, ओबीसींच्या विरोधात बोलल्यास जरांगे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचे तायवाडे म्हणाले.
यावेळी बोलतांना तायवाडे म्हणाले की. "मागील तीन महिन्यापासून राज्यात दोन समाजात संघर्ष सुरू आहे. ओबीसींच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आम्ही संघर्ष करतोय. मंडळ आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला फॅारवर्ड कास्ट म्हटलंय. एकाही आयोगाच्या अहवालात मराठा मागास असल्याचे सांगितले नाही. ओबीसींनी आमचं 70 वर्षापासून चोरलं असल्याचं म्हटलं जातं. पण कुठे चोरलं. आतापर्यंत सात अहवाल झाले पण एकाही अहवालात मराठा समाज ओबीसी असल्याचे सांगितले गेले नाही. हे आमची लायकी काढत आहे, आमची लायकी काढणारे हे कोण आहे. आमची लायकी नाही तर, मग आमच्या पंक्तीत कशाला येतायत असे तायवाडे म्हणाले.
हातपाय कापून ठेवण्याची ताकद ठेवा...
दरम्यान पुढे बोलतांना तायवाडे म्हणाले की, "यापुढे जर असा आमचा अपमान केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही. ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली, त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यात ठेवा. तसेच, मनोज जरांगे यांचं जाहीर धिक्कार करतो. 32 लाख नोंदी सापडल्या असं जरांगे म्हणाले. किती मुर्ख आम्हाला बनवत आहे. एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंदी आहेत, असे बबनराव तायवाडे म्हणाले.
जरांगे यांचे प्रत्युत्तर...
तायवाडे यांच्या याच टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "पाय तोडायला या, मी वाट बघतोय. माझ्या जनतेचे कल्याण होत असेल तर मी पाय तोडून घायला तयार आहे. मराठा समाजाला जर आरक्षण मिळत असेल, तर त्यासाठी पाय तोडून घ्यायला तयार असल्याचे जरांगे म्हणाले.
विजय वडेट्टीवार सभेला गैरहजर...
हिंगोली येथील सभेत विजय वडेट्टीवार येणार की नाही याबाबत सकाळपासून चर्चा होती. मात्र, पक्षाच्या कामानिमित्त हैदराबादला गेलेल्या वडेट्टीवार या सभेत हजर नसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, वडेट्टीवार गैरहजर राहिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे यावर देखील जरांगे यांनी वक्तव्य केले आहे. आज तिथे सभेला वडेट्टीवार आले नाही, पंकजा मुंडे या देखील आज नव्हत्या. त्यांनाही वाटले असेल की जातीयवादी आहे, कुठे मांडीला मांडी लावून बसतात, असे जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: