हिंगोली: देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अद्याप अनेक ठिकाणी नागरिकांना मूलभूत सोई-सुविधा मिळत नाहीत. हिंगोलीत (Hingoli) रस्त्याअभावी गरोदर महिलांना बैलगाडी आणि ट्रॅक्टरमधून धक्के खात रुग्णालयात पोहोचावे लागत आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात गेलेल्या आमदार संतोष बांगर (Shivsena Rebel MLA Santosh Bangar) यांच्या मतदारसंघातील हे धक्कादायक वास्तव आहे. 


बंडखोर आमदार संतोष बांगर ( Santosh Bangar) यांच्या हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील जुनूना लोकवस्तीतील लोकांना या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाले तरीही या गावाला तीन किलोमीटरचा रस्ता नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो.


रस्ताच नाही तर रुग्णाला रुग्णालयात न्यायचं कसं? 


अडीचशे ते तीनशे लोकसंख्या असलेली ही जुनुना लोकवस्ती शेनोडी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये या लोकवस्तीचा समावेश होतो. गावाला रस्ताच नसल्याने गरोदर महिलांना चक्क ट्रॅक्टर आणि बैलगाडीत धक्के खात रुग्णालय गाठावं लागत आहे. 20 ऑगस्टला शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास रूखमा दळवे या महिलेला रात्री बारा वाजताच्या सुमारास अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या. परंतु रुग्णालयात जायला रस्ताच नसल्याने रुग्णालयात न्यायचे कसे हा प्रश्न नातेवाईकांच्या समोर उभा राहीला होता. 


तीन किमीचा प्रवास करण्यासाठी पाऊण तास वेळ 


रात्रभर पाऊस सुरू असतानाही या महिलेच्या नातेवाईकांनी तिला ट्रॅक्टरमधून रुग्णालयात न्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांना तीन किलोमीटर प्रवास पूर्ण करण्यासाठी पाऊण तास वेळ लागला. एकीकडे प्रसूती कळा तर दुसरीकडे ट्रॅक्टरचे धक्के असा प्रवास पूर्ण करून रुखमा दळवे रुग्णालयात पोहचल्या. 


या आधीही अशीच घटना, गावकऱ्यांची रस्त्याची मागणी


काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीने याच गावातील एका गरोदर महिलेला सुद्धा रुग्णालयात जाण्यासाठी याच रस्त्यावरून बैलगाडीने प्रवास पूर्ण करावा लागला आहे. वादग्रस्त वक्तव्याने माध्यमात नेहमीच चर्चेत असलेले बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्याच कळमनुरी मतदारसंघातील हे धक्कादायक वास्तव आहे. बांगर साहेब तुम्ही नेहमीच टीव्हीवर दिसता, तुम्हाला आमच्या गावचा रस्ता दिसत नाही का? असे म्हणत गावाला रस्ता करून द्या अशी मागणी जूनुना येथील ग्रामस्थांनी केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: