Shivsena Rebel MLA Santosh Bangar : आक्रमक भाषणासाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी उघडकीस आणले. एका उपहारगृहाची पाहणी करायला गेलेल्या आमदार बांगर यांचा निकृष्ट दर्जामुळे पारा चांगलाच चढला. संतप्त झालेल्या आमदारांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


महाराष्ट्र शासनाच्यावतीने नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत असलेल्या सर्व कामगारांना मध्यान्ह भोजन दिले जाते. परंतू हे मध्यान्ह भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचा पर्दाफाश बंडखोर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. जेवणाचा निकृष्ट दर्जा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यू प्रमाणे जेवण न दिल्यामुळे आमदार बांगर यांनी जाब विचारत व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. निकृष्ट दर्जाचे मध्यानभोजन कामगारांना देत असल्यामुळे आमदार बांगर चांगलेच आक्रमक झाले होते. 


कामगारांना मध्यान भोजन पुरवण्याची जबाबदारी खासगी कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदाराकडून ती कंपनी अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यूचा कोणताही अवलंब न करता जेवण कामगारांना दिले जात होते. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी आमदार बांगर  यांनी केली आहे. या प्रकरणामुळे बंडखोर शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत आले आहेत. 


शिवसेनेतील बंडानंतर बांगर झाले होते आक्रमक


विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना संजय बांगर हे शिंदे गटात सामिल झाले होते. त्यानंतर हिंगोलीत त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या सभेत बांगर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना इशारा दिला होता. आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका, असं ते म्हणाले होते. त्याआधीदेखील हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाले होते. ''गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा.'' ते म्हणाले होते की, ''मला सर्व शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे. आपण शिवसैनिक आहोत. जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल, त्याच्या कानाखाली आवाज काढा.'' ते म्हणाले, ''आम्ही भिणारे शिवसैनिक नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी का रे म्हणलं, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्या शिवाय आम्ही राहणार नाही.''