Hingoli News: हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. तर अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील एका व्यक्तीने चक्क टॉवरवर चढून फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. 
 
याबाबत अधिक माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील 800 लोकांची संख्या असलेल्या कोंडशी बुद्रुक गावातील बहुतांश युवावर्ग दारू व जुगाराच्या आहारी गेले आहे. दरम्यान स्वतःचा मुलगा मागील काही दिवसापासून दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून गणेश हरिभाऊ गायकवाड ( वय 42 ) यांनी बुधवारी सकाळी हातात दोर घेऊन ग्रामपंचायतच्या मोबाईल टॉवरवर चढून फाशी घेण्याच्या प्रयत्न केला. गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचे आश्वासन पोलीस देत नाहीत तोपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. 


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवळाबाजार पोलीस चौकीवरील पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गायकवाड यांना खाली उतरण्याची विनंती केली. मात्र आधी अवैध दारू विक्री बंदी करा अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली. त्यांनतर पोलिसांनी दारूबंदीचे ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते गणेश गायकवाड हे मोबाईल टॉवरवरून खाली उतरले. यानंतर गावातील मारुती मंदिरासमोर पोलिसांनी गावकऱ्यांची बैठक बोलावून अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 


पोलिसांसमोर आव्हान...


जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री वाढली आहे. त्यामुळे तरुण मुलं याच्या आहारी जात आहे. तर अनेक महाविद्यालयीन मुले नशेच्या आहारी जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच अवैध दारू विक्री विरोधात नागरिक पुढे येऊन, यावर बंदी आणण्याची मागणी करत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रीवर नियंत्रण मिळवणे हिंगोली पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.   


महत्वाच्या बातम्या...


Hingoli : केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस; अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दराने केळीची विक्री


मेलाय तरी पैसे घेणार का? संतोष बांगर डॉक्टरावर भडकले, संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल