Banana Farming : हिंगोली जिल्ह्यात उत्पादित केलेल्या केळीला यंदा  गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक दर मिळाला आहे. केळीला अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे 


हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गिरगाव ते डोंगरकडा या गावांच्या शेतीपट्ट्यामध्ये केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. जळगावनंतर या भागातील केळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. हिंगोली जिल्ह्यातील या भागात उत्पादन घेतलेली केळी चवीला गोड आणि आकाराने मोठे असल्याने राज्यासह देशभरात या केळीला मागणी असते. 


तरीही, मात्र मागील कोरोना काळातील दोन वर्षे केळीला भाव नव्हता. त्यामुळेउत्पादन घेतलेल्या केळी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. कोरोनामुळे केळी उत्पादनासाठी घेतलेला लाखोंचा खर्च वाया गेला. यावर्षी मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  यावर्षी मागील तीन वर्षाच्या तुलनेतील सर्वाधिक भाव मिळाला आहे. तब्बल अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे केळीची विक्री होऊ लागली आहे.  


हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात या केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते यावर्षी केळीला भावही चांगला असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  या केळीला दिल्ली दरबारी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकरी येथील केळी थेट दिल्लीला निर्यात करतात.  त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठा आर्थिक फायदा होतो.  


काही दिवसापूर्वी गिरगाव कुरुंदा या भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील शेकडो हेक्टर शेत जमिनीवरील केळीचे मळे जमिनदोस्त झाले होते. तेव्हा या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. संपूर्ण केळींच्या बागांना असा फटका बसल्याने यावर्षीचे केळीचे उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय, कोरोना काळात केळीचा भाव पडल्याने यंदा केळीची लागवडही कमी झाली. त्यामुळे केळीचे दर वाढवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. केळीला मागील तीन वर्षातील सर्वाधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.