पुराचं पाणी बघायला गेला, पाय घसरुन तरुण बुडाला, तीन दिवसांनी मृतदेह सापडला; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Hingoli News: शेतातील पिकांच्या मुळ्या उघड्या पडल्या आहेत तर पिके सुद्धा मातीत मिसळली आहेत त्यामुळे पुढील काळात या पिकांमधून कोणतही उत्पन्न निघणार नाही,या नुकसानीमुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत,

Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शहरात शोककळा पसरली आहे. पूर पाहण्यासाठी नदीकाठावर गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि वाहून गेला. अखेर तब्बल तीन दिवसांच्या शोधानंतर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला.
मृत तरुणाचे नाव शेख अरबाज शेख फेरोज (वय 18, रा. महादेववाडी, हिंगोली) असे आहे. 29 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला प्रचंड पूर आला होता. या दरम्यान अनेक जण नदीकाठावरून पाण्याचा तडाखा पाहत होते. त्याचवेळी अरबाजचा पाय घसरून तो थेट नदीत कोसळला. भोवतालच्या नागरिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र प्रचंड प्रवाहामुळे तो काही क्षणांत वाहून गेला.
पाणी ओसरल्यानंतर शोधमोहिमेला यश आलं
घटनेनंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व महसूल विभागाने शोधमोहीम सुरू केली. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांना मदत केली. मात्र पुराचा जोर इतका मोठा होता की तीन दिवसांचा आटोकाट प्रयत्न करूनही तरुणाचा काही ठावठिकाणा लागला नाही. रविवारी सकाळी पाणी ओसरल्यानंतर शोधमोहिमेला यश आलं. नदीपुलाजवळ अडकून पडलेल्या अवस्थेत अरबाजचा मृतदेह दिसून आला. पोलिस व नागरिकांनी तत्काळ तो बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, या घटनेमुळे हिंगोली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कयाधू नदीला आलेल्या पुराच्या दृश्यासाठी उत्सुकतेने जमलेला एक तरुण स्वतःच्या आयुष्याला मुकला, ही घटना अत्यंत दुर्दैवी ठरली. परिसरात मोठी गर्दी जमली होती आणि मृतदेह मिळाल्यानंतर वातावरण शोकमग्न झालं. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार प्यारेवाले, आकाश पंडितकर यांच्यासह संपूर्ण पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
नदीच्या पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिकाचं नुकसान
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणच्या नद्यांना पूर आला आहे, त्याच प्रमाणे कयाधू नदीला काल पूर आला होता, या पुराचं पाणी नदीचे पात्र सोडून बाजूच्या शेतीमध्ये शिरले होते, त्यामुळे कयाधू नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतजमीनि वरील पिकांना फटका बसला आहे, सोयाबीन कापूस हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे, शेतातील पिकांच्या मुळ्या उघड्या पडल्या आहेत तर पिके सुद्धा मातीत मिसळली आहेत त्यामुळे पुढील काळात या पिकांमधून कोणतही उत्पन्न निघणार नाही,या नुकसानीमुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत,
हिंगोलीत गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेतजमिनी, पूल व रस्ते जलमय झाले होते. नागरिकांनी पुराच्या पाण्याकडे आकर्षित होऊन धोकादायक ठिकाणी गर्दी करू नये, असा इशारा प्रशासनाकडून दिला गेला होता. मात्र तरीही अनेकांनी नदीकाठावर जाऊन पाण्याचा तडाखा पाहण्याचा धोका पत्करला. परिणामी एका तरुणाला जीव गमवावा लागला.
























