वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी ठरली. आज (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी (9 फेब्रुवारी) रात्रीपासून तिचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही कमी झाले होते. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.


हिंगणघाट इथे 3 फेब्रुवारी रोजी विकेश नगराळे या नराधमाने पेट्रोल टाकून तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी सकाळी कॉलेजमध्ये जात असताना नंदोरी चौकापासून काही अंतरावर दुचाकीवर आलेल्या आरोपी विकी नगराळेने तिच्यावर पेट्रोल फेकलं आणि तिच्या हातात पेटवलेला टेंभा फेकून तिला पेटवून दिलं. त्यानंतर लगेचच त्याने घटनास्थळवरुन पळ काढला. युवतीने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिच्या अंगावर पाणी टाकून तिचे प्राण वाचवले. त्यानंतर तिच्यावर जवळील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आणि नंतर तिला नागपूरच्या ऑरेंज रुग्णालयात दाखल केलं.


या सात दिवसांमध्ये तिच्यावर दोन ते तीन वेळा शस्त्रक्रियाही झाल्या. परंतु कालपासून तिची प्रकृची अतिशय खालावली होती. रक्तदाब तसंच हृदयाचे ठोके कमी झाले होते. श्वासोच्छवास घेण्यासही तिला त्रास होत होता. शिवाय रात्रीपासून तिला दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले आणि त्यातच तिने प्राण सोडले. तिला आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मृत घोषित केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. परंतु गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी पीडितेच्या वडिलांनी फोनवरुन चर्चा केल्यानंतर मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली.





हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीची आई म्हणते मी पीडितेला भेटायला जाणार, तर पत्नी म्हणते...


तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून सर्वधर्मियांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. परंतु त्यांच्या प्रार्थना कामी आल्या नाहीत.  दुसरीकडे जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी म्हणून राज्य सरकारने देखील पावलं उचलली आहेत. कुटुंबियांच्या मागणीनंतर हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


...तसाच त्रास नराधमाला व्हायला हवा : वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया
जसा त्रास‌ माझ्या मुलीला झाला तसाच त्रास त्या नराधमाला व्हावा. निर्भयासारखा नाही लवकरात लवकर न्याय हवा, नाहीतर आमच्याकडे स्वाधीन करा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मृत तरुणीच्या वडिलांनी दिली आहे.


सुनील केदार : हिंगणघाट जळतकांडाच्या घटनेनंतर समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.


मनिषा कायंदे : देशातील अजून एका निर्भयाचा मृत्यू झाला, अशी भावना शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी व्यक्त केल्या.


सुप्रिया सुळे : ही अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. खरंतर हा मृत्यू नसून खून आहे. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, जेणेकरुन तातडीने न्याय मिळेल, असा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जावा, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.


संबंधित बातम्या


हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; आरोपीला 10 मिनिटासाठी ताब्यात द्या, नातेवाईकांची संतप्त प्रतिक्रिया


हिंगणघाटमधील पीडितेची प्रकृती गंभीर, कृत्रिमरित्या श्वासोच्छवास, डॉक्टरांची माहिती


जालना प्रकरण | आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी, वकील संघाकडून आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय