मुंबई : पाकिस्तानातून भारतात 2 हजारांच्या बनावट नोटा येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. क्राईम ब्राँचनं ही कारवाई केलीय. पाकिस्तानातून आलेल्या या 2 हजारांच्या बनावट नोटांची किंमत तब्बल 23 लाख 86 हजार इतकी आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलाय. या नोटा आधी पाकिस्तानातून दुबईत आणि दुबईतून मुंबईत आणल्याचं उघड झालंय. मात्र या बनावट नोटा कोणत्या कामासाठी आल्या आहेत याचा अद्याप खुलासा झालेला नाही.


दोन दिवसापूर्वी मुंबई गुन्हे शाखेने चायनाचे सिम बॉक्स कनेक्शन असलेली टोळी उध्वस्त केली होती. ही टोळी भारताचे कॉल रूट करून करोडो रुपयांचा गंडा लावत होती. तर आज मुंबई गुन्हे शाखेने पाकिस्तान मधून दुबईमार्गे आणलेल्या दोन हजाराच्या नकली नोटा आणणाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक केली आहे. ही रक्कम वीस लाख होती आणि याचा वापर अतिरेकी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता मुंबई गुन्हे शाखेकडून वर्तवण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईत 23 लाख 86 हजार इतक्या किमतीच्या 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी कळवा परिसरात राहणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ज्याने या नोटा दुबईतून भारतात आणल्या आहेत. जावेद गुलामनबी शेख असे या अटक करण्यात आलेल्या 36 वर्षीय आरोपीचे नाव आहे.

अटक केलेल्या आरोपीची चौकशी केली असता या सगळ्या नोटा पाकिस्तानातून दुबई आणि दुबईतून भारतात आणल्या गेल्या असल्याचे त्याने सांगितलं आहे. पाकिस्तानातून या नोटा भारतात आल्याने कुठल्या घातपाती कारवायांसाठी हा पैसा आला होता का? या दिशेने सुद्धा पोलीस तपास करत आहेत. बनावट नोटा 22 लाखांच्या असल्याने इतके सारे पैसे भारतात कोणत्या कामासाठी पुरवले जात होते आणि हे एक मोठे रॅकेट आहे का? याचाही तपास सध्या सुरू आहे.