वर्धा : एकतर्फी प्रेमातून समाजमन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्य़ातील हिंगणघाट येथे सोमवारी घडली. एका विवाहित तरुणाने भररस्त्यात प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. विकेशच्या आईने मात्र पीडित तरुणी सोबत जे घडले ते चूक आहे. अखेरीस ती ही कोणाची तरी लेक आहे, तसेच आपल्या सुनेकडे बोट करत ती ही कोणाची तरी सून आहे. पिडित तरुणी रुग्णालयातून बरी होऊन आल्यानंतर तिला नक्कीच भेटायला जाईन, असे अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्र्या व्यक्त केली आहे.

घटनेच्या आदल्या दिवशी रात्रभर न झोपलेला विकेश सकाळीच सर्वांच्या उठण्याआधीच घरातून निघून गेला होता. नंतर दुपारी पोलीस आले तेव्हा समजले की, विकेशने अशी घटना घडविली आहे. विकेशची पिडित तरुणी सोबत दहावीपासून ओळख होती. दोघे एकाच बसने हिंगणघाटला जायचे. दोन्ही कुटुंबातील पालकांमध्ये ही मैत्रीपूर्ण संबंध होते. विकेशची तिच्यासोबत लग्नाची इच्छा होती, मात्र तसे घडू शकले नाही. नंतर विकेशने स्वतः मी इतरत्र लग्न करतो असे त्याच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्यानंतर विकेशच्या इच्छेने त्यांचा विवाह प्रियासोबत झाला. एप्रिल 2019 मध्ये लग्न झालेल्या विकेश आणि प्रियाला अवघ्या 11 दिवसांपूर्वी मुलगी झाली आहे.

Wardha Woman Ablaze | "आरोपीलाही तशाच प्रकारे जाळून टाकावं", हिंगणघाटच्या पीडितेच्या आईची संतप्त प्रतिक्रिया



प्रिया विकेशची पत्नी मुलीच्या देखरेखीत गुंतलेली असताना काल विकेश प्रचंड तणावात दिसत होता. त्याच्या मनात चलबिचल सुरू होती. रात्रभर तो बेडरूममध्ये येरझरा मारत राहिला आणि पहाटे न सांगता निघून गेला. प्रियाच्या मते विकेशने लग्न झाल्यानंतर जुनी मैत्री संपली आता मी त्या तरुणीशी बोलत ही नाही असे आश्वासन तिला दिले होते. मात्र विकेश कधीच आपला मोबाईल पत्नीला किंवा कोणाला ही पाहू देत नव्हता. कधी कधी तो रात्रभर चॅट करायचा आणि त्या दिवशी तणावात ही राहायचा.

पीडित तरुणीची प्रकृती अजूनही गंभीर आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची त्वचा जळाली आहे. तर श्वसनप्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. तोंड आणि नाकातून मोठ्या प्रमाणात धूर तिच्या शरीरात गेल्यानं तिच्या फुफ्फुसांवर परिणाम झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आरोपीच्या कृत्याचा राज्यभरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी जात आहे. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीयांकडून हिंगणघाट बंद पुकारण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; तरुणीची प्रकृती गंभीरच, आरोपीला कृत्याचा पश्चाताप नाही

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; आरोपीला 10 मिनिटासाठी ताब्यात द्या, नातेवाईकांची संतप्त प्रतिक्रिया