Nagpur GDC : देशातील टॉप 10 दंत महाविद्यालयाच्या यादीत, एकमेव शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाने देशात 9 वे तर राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. देशातील टॉप 10 दंत महाविद्यालयांच्या यादीत नागपूर दंत महाविद्यालय वगळता एकही शासकीय दंत महाविद्यालय नाही हे विशेष.
नागपूरः केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॅंकिंग फ्रेमवर्कअंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे रँकिंग करण्यात आले. यात नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाने देशात 9 वे तर राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. देशातील टॉप 10 दंत महाविद्यालयांच्या यादीत नागपूर दंत महाविद्यालय वगळता एकही शासकीय दंत महाविद्यालय नाही हे विशेष.
शासकीय दंत महाविद्यालयातील शैक्षणिक पद्धत, प्रसिद्ध करण्यात येणारे रिसर्च पेपर आणि विद्यार्थ्यांसाठी आणि येणाऱ्या रुग्णांसाठीच्या सोयीसुविधा आदींमध्ये नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाने बाजी मारली. महाविद्यालयाने डिजीटलायझेशनची कास धरली असल्यामुळेच हे शक्य झाले आहे. लवकरच विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल लॅब व स्किल लॅबही साकारली जाणार आहे. त्यामुळे भावी दंत चिकित्सकांना अधिक बारकाव्यांसह प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करता येणार आहे.
दंत महाविद्यालयाकडून अस्तित्वातील विभागांना अत्याधुनिक करण्यासोबतच नवे विभाग सुरू करण्यासह महाविद्यालयाची नवी इमारत उभी राहत असून येथे सुपरस्पेशालिटी उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्याची तयारीही सुरू आहे. स्वाध्याय 1 व स्वाध्याय 2 अशा दोन्ह डिजिटल वर्गखोल्या तयार आहेत. आता व्हर्च्युअल लॅब साकारली जात आहे. त्यासाठी स्टिम्युलेटरची गरज असेल. हे यंत्र खरेदीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हाफकीनकडून निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे पुढील सहा महिन्यात व्हर्च्युअल लॅब कार्यान्वित होऊ शकेल. ही सुविधा उपलब्ध होताच विद्यार्थ्यांना स्क्रिनवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून पाहता येईल. रुग्णांकडे सुटे पैसे नसल्याने अडचणी येत होत्या. अलिकडेच ओपीडीमध्ये ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला असल्याचे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी सांगितले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये देशातील खासगी आणि शासकीय अशा सुमारे 177 दंत महाविद्यालय सहभागी झाले होते. यापैकी नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने 9 वे क्रमांक पटकावले. तर राज्यातील सहभागींपैकी दुसऱ्या स्थानाचे मान नागपुरच्या दंत महाविद्यालयाला मिळाले आहे.