Gadchiroli Naxalism News : गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी (Naxalist) एका निर्दोष आदिवासी तरुणाची हत्या केली आहे. रामजी चिन्ना आत्राम असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात कापेवंचा जवळ नक्षलवाद्यांनी रामजी आत्रामची गोळ्या घालून हत्या केली आहे. गेल्या दहा दिवसात नक्षलवाद्यांकडून निर्दोष नागरिकांच्या हत्येची गडचिरोलीतील ही तिसरी घटना आहे. या तिन्ही घटना दक्षिण गडचिरोलीत घडल्या असून तिथे नक्षलवादी अचानक प्रचंड सक्रिय होऊन नागरिकांना टार्गेट करत असल्याचे चित्र आहे.


रामजी आत्राम यांनी गेल्या वर्षी नक्षलवाद्यांची काही माहिती पोलिसांना पुरवली होती. त्यानंतर पोलिसांसोबत झालेल्या एका एन्काऊंटरमध्ये एका महिला नक्षलवादी मारली गेली होती असा आरोप ठेवत नक्षलवाद्यांनी रामजी आत्राम यांची हत्या केली. त्या ठिकाणी तशा आशयाचे पत्रकही ठेवले आहे. 


दहा दिवसात तिघांची हत्या 


गेल्या दहा दिवसात निर्दोष नागरिकांच्या हत्येची ही तिसरी घटना आहे. 15 नोव्हेंबर रोजी भामरागड तालुक्यात पेनगुंडा येथे दिनेश गावडे या युवकाची हत्या करण्यात आली होती. तर 23 नोव्हेंबर रोजी टिटोळा येथे पोलीस पाटील लालसु वेडदाची हत्या करण्यात आली होती. आता शुक्रवारी रात्री अहेरी तालुक्यात रामजी आत्रामची हत्या करण्यात आली आहे.


दिनेश गावाडे याची हत्या 


काही दिवसांपूर्वी दिनेश पुसू गावडे या 27 वर्षाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. तो लाहेरी गावातील रहिवासी होता. पोलिसांचा खबऱ्या असल्याचे आरोप करत नक्षलवाद्यांनी 15 नोव्हेंबरला त्याची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या गोंगवाडा ते पेनगुंडा रोडवरील पेनगुंडा गावाजवळ ही घटना घडली आहे. लाहेरी गावातील रहिवासी असलेला दिनेश गावडे हा बुधवार 15 नव्हेंबर रोजी गावातून कामानिमित्त बाहेर गेला होता. त्या दिवशी तो घरी परतलाच नाही. आज 16 नोव्हेंबर सकाळी त्याचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी नक्षल्याकडून एक पत्र देखील ठेवण्यात आले आहे. या घटनेचा तपास लाहेरी पोलिस करत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नक्षलवाद्यांच्या  कारवाईला कधी पायबंद घातला जाईल असा प्रश्न नागरिकांनी उपस्थिती केला आहे.


ही बातमी वाचा: