OBC Mahasangh Protest :मनोज जरांगे यांनी सरसकट हा शब्द वगळायला समर्थन दिलं; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून स्वागत; बबनराव तायवाडे म्हणाले, जरांगे द्विधा मनस्थितीत
OBC Mahasangh Protest : मनोज जरांगे यांची मागणी रोज बदलत असते, जरांगे यांच्या मागणीत स्पष्टता नाही, ते द्विधा मनस्थितीत असल्याचे बबनराव तायवाडे यांनी सांगितले.

OBC Mahasangh Protest : मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी सरसकट हा शब्द वगळायला समर्थन दिलंय. हि आमची आधीपासूनची मागणी होती, मनोज जरांगे यांनी ती आता मान्य केली असल्याचे सांगत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून स्वागत करण्यात आलं आहे. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे त्यांना ओबीसी आरक्षण देण्यास आमचा आधीपासून विरोध नाही. मात्र मनोज जरांगे यांची मागणी रोज बदलत असते, जरांगे यांच्या मागणीत स्पष्टता नाही, ते द्विधा मनस्थितीत असल्याचे बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
ओबीसींच्या मागणीला घेऊन साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सरकारने आम्हाला चर्चेला बोलावून आश्वस्थ करावे किंवा सरकारच्या शिष्टमंडळ येऊन आमची भेट घेऊन आश्वस्थ करावे आम्ही ते मान्य करून मात्र तेव्हा पर्यंत आमचे साखळी उपोषण सुरूच राहील असेही ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी स्पष्ट केलंय.
कुणबी ही उपजात आहे हेच कायदा सांगतो- मनोज जरांगे पाटील
अभ्यासकांशी आम्ही चर्चा केलीय, आम्ही कोणतीही कागदपत्र देणार नाही. सरकारने 13 महिन्यांपूर्वी कागदपत्र घेतली असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सातारा संस्थानचे आणि हैदराबाद संस्थानचे गॅझेटियरमध्ये संपूर्ण मराठवाडा बसतो. सातारा संस्थानाचे गाझेटियर मराठवाड्यातला मराठा कुणबी असल्याचं सांगतो असे जरांगे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सरकारला अडथळा असणे शक्य नाही, असेही जरांगे म्हणाले. 58 लाख नोंदी आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, किंवा ज्यांच्या नाही सापडल्या त्यांची पोट जात घ्या आणि अध्यादेश काढा, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. कुणबी ही उपजात आहे हेच कायदा सांगतो. ओबीसी पात्र करायचं असेल तर पोटजात उपजात म्हणून मराठा कुणबी म्हणून घ्या. सरसकट म्हणायची गरज नाही असे जरांगे म्हणाले.
अंतरवली सराटीमध्ये ओबीसींचा आंदोलनाचा पवित्रा
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर अंतवली सराटीमध्ये ओबीसी कार्यकर्ते उपोषण आंदोलनाला बसण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी स्थळ निश्चिती आणि आंदोलकांची माहिती देण्याच्या अटीवर परवानगी देणार असल्याच म्हंटलय. दुसरीकडे आंदोलक आंदोलनावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला असून आरसिपीची तुकडी देखील तैनात करण्यात आलीय.
मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवू नये- डॉ. बबनराव तायवाडे
मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवू नये, ही आमची सरकारकडे मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पस्ट केले आहे कि, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. याचे आम्ही स्वागत करतो. मात्र ही सरकारची जबाबदारी आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावात सरकार कुठलही निर्णय घेवू नये, यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून लक्ष ठेवले जाईल. असेही ते म्हणाले.

























