Dhule News धुळे : तालुक्यातील निमगूळ परिसरात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हजेरी लावल्यामुळे काढणीला आलेला गहू, बाजरी, लिंबू व टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा (Farmers) हवालदिल झाल्याचे चित्र आहे. 


राज्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. धुळे जिल्ह्यात (Dhule News) देखील काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आधीच बळीराजा चिंतेत असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेले पीक देखील हिरावलं गेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 


नुकसान भरपाईची मागणी


कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत व या नुकसानीची पाहणी करावी. तसेच लवकरच नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल विभागाला संयुक्त पंचनामा करण्याच्या सूचना करून शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 


शेतकऱ्यांनी धीर सोडू नये - कुणाल पाटील 


दरम्यान, अवकाळी पाऊस, गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी धीर न सोडता नैसर्गिक संकटाचा खंबीरपणे सामना करावा. शेतकऱ्यांवर आलेल्या प्रत्येक संकटात मी सोबत असून, शेतकऱ्यांना न्याय व मदत मिळावी म्हणून विधानसभेसह रस्त्यावर लढाई लढण्यास सज्ज आहे, असे आमदार कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.


राज्यात अवकाळी पावसाचे थैमान


अकोला, बुलढाण्यासह, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा तडाखा दिला. यामुळे हजारो हेक्टर रब्बी, भाजीपाला पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, गहू ही पिके जमीनदोस्त झाली.रब्बीच्या ऐन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.


जळगाव जिल्ह्यात गारपीट


जळगाव जिल्ह्यात अमळनेर रावेर पारोळासह चाळीसगाव तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसला असून सर्वाधिक नुकसान चाळीसगाव तालुक्यात झाले आहे. चितेगाव, शामवाडी, बेलदारवाडी, कोदगाव, शिवापूर तांबोळे, पिंप्री, गणेशपुर, पाटणा, ओढरे आदी गावांना प्रामुख्याने गारपिठीची मोठा फटका बसलाय. कांदा, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा हे रब्बी पिक जमीनदोस्त झाल्याने शेकडो एकरवर मोठे नुकसान झाले आहे. 


आणखी वाचा 


Rain : निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत