Special Report : दादा कोंडके ते वाघ, विधानसभेत 'डबल मिनिंग' आणि 'डरकाळ्या'!
विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासात बुधवारी दादा कोंडके आणि वाघ या विषयांवरून चर्चा झाली. भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला नाले रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारले. इंजिनिअरला निलंबित करणार का, मौका चौकशी करणार का, आणि नाला योग्य पद्धतीने बांधणार का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यावर समर्पक उत्तर दिले नाही. राठोड यांच्या त्रोटक उत्तरामुळे मुनगंटीवार संतापले आणि त्यांनी दादा कोंडकेंचा उल्लेख केला. मुनगंटीवार म्हणाले, "हे द्विअर्थी लागलं. दादा कोंडकीचं उत्तर आहे का हे?" यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राठोड यांना सूचना केल्या. दादा कोंडकेंच्या विषयावर चर्चा झाल्यानंतर वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दिली जाणारी मदत वाढवण्याविषयी विधानसभेत स्पष्टीकरण देण्यात आले. वाघाच्या मुद्द्यावरूनही वाद रंगला. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 'ह्युमन एरर' आणि 'ह्युमन इंटरफेरन्स' यामुळे होणारा भाग आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले. यावरही वाद सुरू झाला आणि विधानसभा अध्यक्षांना हस्तक्षेप करून तो थांबवावा लागला. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी दादा कोंडके आणि वाघ यांची मोठी चर्चा सभागृहात झाली.