Unseasonal Rain : सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार (IMD), पुढील 2-3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbh) अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे देखील नुकसान झालंय, यामुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत असून विदर्भात काल ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला होता. हवामान विभागाकडून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ऐन थंडीत पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांची देखील भंबेरी उडालीय.


 


मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान; भोकरदन, जाफराबाद भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट


छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबादमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक पावसाने शेतामध्ये गारपीट झाली आहे. यामुळे शेतामध्ये हरबरा, गहू, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे.


 


गहू, ज्वारी हरभऱ्यासह,फळबागांना मोठा फटका, 2 जण ठार


जालन्यात झालेल्या  रात्रीच्या पावसाने गहू, ज्वारी हरभऱ्यासह,फळबागांना मोठा फटका बसला आहे. तर जाफराबाद ,भोकरदन तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय. या भागात काल अचानक झालेल्या पावसात जोरदार गारपीट झाली, या गारपिटीने गहू ज्वारी या प्रमुख पिकांसह फळपिकांच देखील मोठं नुकसान झालं आहे. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, नळहिवरा, काळेगाव, भातोडी यासह इतर गावांना गारपिटीचा काल रात्री जोरदार तडाखा बसला, तर भोकरदन तालुक्यातील पारध, सिपोरा, वाळसांगवी, पद्मावती या गावांना गहू, हरभरा पिकांसह आंब्यासह इतर फळपिकांना मोठा फटका बसला. या अवकाळीत अर्चना उर्फ पल्लवी विशाल दाभाडे (वय 21 ) राहणार कुंभारी तालुका भोकरदन आणि सिपोरा ता.भोकरदन येथील शेतकरी  शिवाजी कड (वय 38) यांच्यावर वीज कोसळून ठार झाले आहेत.



बुलढाणा जिल्ह्यात निसर्ग कोपला, प्रचंड गारपीट, रब्बी पिकांच मोठ नुकसान.


बुलढाणा जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं. सायंकाळपासून मेघगर्जना तसेच वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात अनेक भागात गारपीट झाल्याने शेताच्या नुकसानीसह तापमानात मोठा गारवा निर्माण झाला आहे. चिखली, देऊळगाव राजा रोड बर्फाने झाकला गेला होता. शेतात गारीचे खच दिसून आले. 



पक्ष्यांचा मृत्यू, वीज पुरवठा खंडीत


बुलढाण्यात झाडावरील पक्ष्यांना गारपीटचा फटका बसल्याने शेकडो बगळे झाडावरून खाली कोसळले त्यात बऱ्याच बगळ्याचा मृत्यू झाला तर काही पक्षांनी गावातील घरांचा सहारा घेत जीव वाचवीला.जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा तालुक्यात शेतातील गहू, हरबरा काढणीला आला होता. त्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाल असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सतत तीन ते चार तास सर्वत्र वादळी पाऊस सुरु होता, यामुळे मात्र शेतकरी चिंतातुर दिसून आले. जणू काही जिल्ह्यात निसर्गच कोपला अस चित्र पाहायला मिळत होत. जिल्ह्यात वादळी पाऊस असल्याने जिल्ह्यात विज पुरवठा खंडीत करण्यात आला असून जिल्हा अंधारात होता. ठिकठिकाणी गारपीट झाल्याने हवेत प्रचंड गारवा वाढला आहे. त्यामुळे आता मानवी आरोग्यावर याचा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी तात्काल जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला व जिल्ह्यातील परिस्थिती विषद केली.. तसेच तातडीने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याची विनंती तुपकर यांनी प्रशासनाला केली.



भागवत कथा सुरू असताना मंडप कोसळला, अपघातमुळे महामार्ग ठप्प


संग्रामपूर तालुक्यात वणखेड गावात भागवत कथा सुरू असताना आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला. सुदैवाने जीवित हानी नाही , मात्र अनेक वृद्ध भाविक मंडपा खाली दबल्या गेले होते. प्रसंगावधान राखत गावातील तरुणांनी भाविकांची सुखरूप सुटका केली. वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे शेगाव - संग्रामपूर मार्गावर झाडे उन्मडून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वर वादळी वाऱ्यामुळे तसेच  मुसळधार पावसामुळे भरधाव ट्रकला मलकापूर जवळ अपघात झाल्याचे समोर आले. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या तीन किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. एकेरी वाहतूकही वाहतूक कोंडीमुळे बंद झाली होती.


 


अकोल्यात रब्बी  गहू, हरभरा, भाजीपाला पिके, आंबा पिकाला फटका 


अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या आड़सुळ ते तेल्हारा रस्त्यावर झाडे पडल्यानं रस्ता बंद झाला होता. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा आणि पातूर तालुक्यातल्या अनेक भागांत गारांसह पाऊस. रात्री 9 वाजतानंतर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळाला, यामुळे रब्बी  गहू, हरभरा, भाजीपाला पिके आणि आंबा पिकाला फटका बसला आहे..


 


जळगाव जिल्ह्यात अमळनेर, रावेर, पारोळा, चाळीसगाव तालुक्यात गारपीट


जळगाव जिल्ह्यात अमळनेर रावेर पारोळा सह चाळीसगाव तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसला असून सर्वाधिक नुकसान चाळीसगाव तालुक्यात झाले आहे. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या वादळ, गारपीट अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. चितेगाव, शामवाडी, बेलदारवाडी, कोदगाव, शिवापूर तांबोळे, पिंप्री, गणेशपुर, पाटणा, ओढरे, इत्यादी गावांना प्रामुख्याने गारपिठीची मोठा फटका बसलाय. कांदा, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा हे रब्बी पिक जमीनदोस्त झाल्याने शेकडो एकरवर मोठे नुकसान झाले आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकरी दुष्काळाच्या संकटातून सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळीच्या संकटात सापडला आहे. हातात तोंडाशी आलेला घास अवकाळीमुळे हिरावला गेल्याने शेतकऱ्यांना पुढे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे...