बंगळुरु : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असतानाच सध्याचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी एक मोठी खेळी केली आहे. रामनगरनंतर त्यांनी आणखी दोन शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू ग्रामीण जिल्ह्याचे नाव आता 'बंगळुरू नॉर्थ' तर बागेपल्लीचे नाव 'भाग्यनगर' असे करण्यात आलं. कर्नाटक काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सिद्धारमय्या यांनी ही चाल खेळल्याची चर्चा आहे.
कर्नाटकात नामांतराची मालिका सुरूच
या आधी मे महिन्यात रामनगर जिल्ह्याचे नाव बंगळुरू दक्षिण असं करण्यात आलं होतं. तो प्रस्ताव उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मांडला होता. आता पुन्हा दोन महत्त्वाच्या भागांची नावे बदलण्याची घोषणा झाली आहे.
काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षाचा सूर
राज्यात काँग्रेस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा पुन्हा जोरात सुरू आहेत. काही आमदारांनी डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. रामनगरचे आमदार एच. ए. इक्बाल हुसेन यांनी याबाबत जाहीर वक्तव्य केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कर्नाटकात सप्टेंबर महिन्यामध्ये नेतृत्वबदल होणार असून डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य एच. ए. इक्बाल हुसेन यांनी केलं होतं.
पाच वर्षे मीच मुख्यमंत्री
पाच वर्षे कर्नाटकात नेतृत्व बदल होणार नसून आपणच मुख्यमंत्री कायम राहणार असल्याचं सिद्धारमय्या यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सरकार खंबीर आहे आणि कोणताही अंतर्गत वाद नाही असंही ते म्हणाले. तर डी के शिवकुमार यांनीही नेतृत्व बदलाची शक्यता नाकारली आहे.
कर्नाटकात अडीच वर्षांच्या फॉर्म्युला?
मे 2023 मध्ये काँग्रेसने विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर सिद्धरामय्या, तर उपमुख्यमंत्रीपदावर डी. के. शिवकुमार यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला मांडण्यात आला होता अशी चर्चा आहे. मात्र, यावर पक्षाने कधीच अधिकृत घोषणा केली नाही. तर दुसरीकडे डी के शिवकुमार यांनी मात्र मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा लपवलेली नाही.
कर्नाटक विधानसभेतील सदस्यसंख्या
2023 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर खालीलप्रमाणे पक्षवार स्थिती आहे:
कर्नाटक विधानसभेच्या एकूण जागा - 224
- काँग्रेस (INC): 135 जागा
- भाजप (BJP): 66 जागा
- जेडी(एस) (JD‑S): 19 जागा
- स्वतंत्र (IND)
- इतर: 4 जागा (IND 2, SKP 1, KRPP 1)
सरकार: काँग्रेस बहुमत (135/224)
विरोधी पक्ष: भाजप (66), त्यासह JD‑S (19) व इतरांचा सहभाग
ही बातमी वाचा: