(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tuljabhavani Temple : सुट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय; पहाटे 1 वाजेपासून मंदीर दर्शनासाठी खुले
Tuljabhavani Temple : 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत श्रीतुळजाभवानी मंदीर पहाटे एक वाजता चरणतिर्थ होऊन भाविकांना दर्शनार्थ खुले करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
धाराशिव (तुळजापूर) : शनिवारी, रविवार आणि त्यात सोमवारी नाताळ सणाची (Christmas Festival) सुट्टी (Holiday) असल्याने अनेकजण सुट्टीचे नियोजन करत असतात. त्यातल्या त्यात महत्वाच्या मंदिरात या काळात भाविकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळत असते. दरम्यान, याच सुट्टयांच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता तुळजाभवानी मंदीर (Tuljabhavani Temple) प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत श्रीतुळजाभवानी मंदीर पहाटे एक वाजता चरणतिर्थ होऊन भाविकांना दर्शनार्थ खुले करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी तुळजाभवानी मंदीरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर प्रशासनाला देखील मोठी कसरत करावी लागते. या काळात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण येऊन भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन घडवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून प्रयत्न केले जाते. रांगेतून आलेल्या भाविकांना श्रीतुळजाभवानी मूर्तीचे सुलभ मुख दर्शन घडविण्यासाठी नाताळ सुट्टीनिमित्त मोठी गर्दी होते. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने 25 डिसेंबर रोजीचे चरणतीर्थ पहाटे एक वाजता होईल, असे स्पष्ट केले आहे.
मंदिर प्रशासनाचा निर्णय...
- 25 डिसेंबर रोजीचे चरणतीर्थ पहाटे एक वाजता होईल.
- 27 ते 31 डिसेंबर दरम्यान येणारे मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा या दिवशी भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून सकाळचे चरणतिर्थ पहाटे 1 वाजता होऊन पुजेची घाट सकाळी 6 वाजता होईल.
- अभिषेक सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत व सायंकाळी 7 ते 9 वाजता या वेळेत संपन्न होतील.
- तसेच अभिषेक कालावधीत देणगी दर्शन बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंदीर प्रशासनाने केले आहे.
- पोर्णिमाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी 25 रोजी रात्री छबिना तर मंगळवार 26 रोजी रात्री छबिना व जोगवा व बुधवार 27 रोजी रात्री छबिना काढला जाणार आहे.
मौल्यवान अलंकार चोरी प्रकरण चर्चेत
मागील काही दिवसांपासून धाराशिव येथील तुळजाभवानी मातेचा बहुचर्चित प्राचीन व मौल्यवान अलंकार चोरी प्रकरण चर्चेत आहे. दरम्यान हाच मुद्दा विधिमंडळात उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल केली आहे. विशेष म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सात पैकी पाच जण मयत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून मयत लोकांवर गुन्हे दाखल करून काय साध्या होणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात असून, यात नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: