(Source: Poll of Polls)
बीडनंतर आता धाराशिवमध्ये संचारबंदी, जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय; काय सुरू, काय बंद राहणार?
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये तुरोरी येथे कर्नाटकमधून उमरग्याकडे येणारी कर्नाटकमधील एसटी बस आंदोलकांनी पेटवली. बसमधील प्रवासी उतरवून ही बस पेटवण्यात आली
धाराशिव : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यात (Dharashiv News) हिंसक वळण लागले. एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेमुळे धाराशिव जिल्हा हादरला आहे.
धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होऊन खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Maratha Reservation) या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नुकतेच त्यांनी आदेश जारी केले आहे.
पुढील आदेशापर्यंत संचारबंदी
धाराशिव जिल्हयात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेस मोठया प्रमाणावर हानी पोहचत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्याच्या विविध भागात आंदोलन, उपोषण, निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे.
संचारबंदीच्या आदेशातून सूट कोणाला?
1. शासकीय / निमशासकीय कार्यालये.
2. दूध वितरण.
3. पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना.
4. सर्व बँका,
5. दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना.
6. रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था यांना सुट दिली आहे.
पाचपेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र येता येणार नाही
धाराशिव जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आले आहे. संचारबंदी आदेश शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र येता येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे कर्नाटकची बस पेटवली
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये तुरोरी येथे कर्नाटकमधून उमरग्याकडे येणारी कर्नाटकमधील एसटी बस आंदोलकांनी पेटवली. बसमधील प्रवासी उतरवून ही बस पेटवण्यात आली. कर्नाटकातील भालकीहून पुण्याला जाणारी ही बस होती. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बससा अज्ञात इसमानकडून आग लावण्यात आली. भालकी ते पुण्याला जाणारी बस होती. बस मध्ये 39 प्रवाशी होते. सर्व प्रवाशांना खाली उतरवून बसला आग लावण्यात आली.
आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण
राज्यात मध्यरात्रीपासून या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. एसटी बसेस तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांना आग लावण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी कार्यालयांवर दगडफेक करून आग लावण्याचे प्रकार घडले. शासकीय आणि खासगी कार्यालयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हे ही वाचा:
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पहिल्या भाजप आमदाराचा राजीनामा, बीडच्या आमदाराने पद सोडलं