धाराशीव जिल्ह्यात 50 टक्के पेरण्या पूर्ण, सर्वाधिक पेरणी सोयाबीनची, उडदाच्या लागवडीतही वाढ
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात देखील चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. धाराशीव जिल्ह्यात खरीप हंगामातील 50 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
Dharashiv Agriculture News : राज्याच्या अनेक भागात पेरणीसाठी (Sowing) समाधानकारक पाऊस (Rain) झाला आहे. त्यामुळं पेरणीच्या कामांना वेग आलाय. ठिकठिकाणी शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात देखील चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. धाराशीव जिल्ह्यात खरीप हंगामातील 50 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी उडीदच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक रविंद्र माने (Ravindra Mane) यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामातील 50 टक्के पेरणी पूर्ण
धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामातील 50 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्हाभरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता चाढ्यावर मूठ धरली असून मागील आठ ते दहा दिवसांत 5 लाख 4 हजार 700 हेक्टर या पेरणी योग्य क्षेत्रापैकी 2 लाख 57 हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाही शेतकऱ्यांनी सर्वाधिक सोयाबीनवरच भर दिला आहे. 2 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे असल्याची माहिती अधिक्षक रविंद्र माने यांनी दिली.
शेतकऱ्यांचा उडीद पिकाकडे मोठा भर
दरम्यान, वेळेवर पाऊस झाल्यानं अनेक शेतकऱ्यांनी उडीद पिकाकडे मोठा भर दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये उमरगा तालुक्यातील आतापर्यंत सर्वाधिक 67 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती रविंद्र माने यांनी दिली आहे. समाधानकारक पाऊस झाल्यामुळं शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत.
राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस
राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी तर मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागातील शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. ठिकठिकाणी शेतकरी पेरणी करताना दिसत आहेत. दरम्यान, ज्या भागात अद्याप चांगला पाऊस झाला नाही, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. साधारणत: 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन करण्यात येत आहे.
जून महिन्यात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद
दरम्यान, यावर्षी जून महिन्यात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जून महिन्यात एवढा पाऊस होत नाही. पण यावर्षी जून महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं शेतकरी देखील समाधानी आहेत. दरम्यान, यावर्षी एल निनोटी परिस्थिती नसल्यामुळं चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं देखील वर्तवला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी यंदाचा पावसाळा चांगला असल्याचं बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
100 मिलिमीटर पाऊस झालाय का? शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, कृषी विभागाचं आवाहन