मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला अशी काही परिस्थिती नाही. या सरकारचं म्हणजे दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून हे पेढे वाटत आहेत असं चाललंय. हे पेढे वाटणं त्यांनी जरा बंद करावं, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निकालानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांची मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात चिंतन बैठक झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन मंत्री व्ही सतीश तसंच विजय पुराणिक उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


ते म्हणाले की, आजची बैठक ही बराच वेळ आधीच ठरली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. आमच्या 52 जागा होत्या. त्या यावेळी 106 जागा झाल्या आहेत. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर सुद्धा भाजप मोठा पक्ष आहे. गेल्या वेळी नागपूर जिल्हा परिषदेत आमच्या 21 जागा आल्या होत्या. शिवसेनेच्या आठ-नऊ जागा आल्या होत्या. आम्ही एकत्रितपणे सत्तेत आलो होतो. यावेळी आम्ही वेगळे लढलो आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढली. आमच्या जागा 21 वरुन 15 वर आल्या. तर शिवसेनेच्या सात जागा कमी झाल्या. एकूण जे राजकीय गणित आहे ते नव्याने तयार झालं आहे. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागेल, असेही ते म्हणाले.

मनसे आणि भाजप एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही, मनसेने कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार होऊ शकतो, त्यांची विचारसरणी वेगळी आहे, असा पुनरुच्चार देखील त्यांनी केला.

भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष : भाजपचा दावा 

राज्यात बुधवारी निकाल जाहीर झालेल्या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत एकूण 332 जागांपैकी 106 जागा जिंकून भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असल्याचा दावा भाजप महाराष्ट्रने ट्वीट करत केला होता. सोबतच या निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन देखील केले होते.

जिल्हा परिषदांसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एकूण 664 जागांपैकी 194 जागा जिंकून तेथेही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राज्याच्या कोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ या तीन विभागातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालात भाजपाने आपली आघाडी राखली आहे, असा दावा भाजपने केला आहे. भाजपला सर्वाधिक 106 जागा मिळाल्या तर काँग्रेस ( एकूण 70 जागा), राष्ट्रवादी काँग्रेस (46) व शिवसेना (49) हे अन्य पक्ष जिंकलेल्या जागांच्या बाबतीत भाजपपेक्षा बरेच मागे राहिले. पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 194 जागा मिळाल्या असताना काँग्रेस (145 जागा), शिवसेना (117) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (80) हे पक्ष भाजपापेक्षा संख्याबळाच्या बाबतीत मागे राहिले आहे, असे देखील भाजपने म्हटले आहे.


संबंधित बातम्या 

 Akola ZP Election Result : अकोला जिल्हा परिषदेत वंचित सर्वात मोठा पक्ष, सत्ता वंचितकडे राहण्याची शक्यता 

 शिवसेनेच्या दोन नाराज आमदारांकडून जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचाच पराभव? 

 Palghar ZP Result | पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेचं वर्चस्व तर भाजपला मोठा दणका

 Dhule ZP Election Result : धुळे जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपची एकहाती सत्ता 

 Nagpur ZP Electon Result : निवडणुकीत भाजपची धूळदाण, होमग्राऊंडवरच देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का

 Nandurbar ZP Election | नंदुरबार जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, काँग्रेस-भाजपला प्रत्येकी 23जागा, शिवसेनेच्या हाती सत्तेची चावी