'शांत रहने का, मैं उद्धव ठाकरे का ड्रायव्हर हूं'
पुण्याचे डीआयजी निशिकांत मोरेंवर त्यांच्याच मित्राच्या मुलीनं विनयभंगाचा आरोप लावला आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी ही बेपत्ता आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे ड्रायव्हर दिनकर साळवेंचा देखील सहभाग असल्याची माहिती उघड झाली होती. तक्रारदार मुलीच्या पालकांना धमकावल्याचा आरोप दिनकर साळवेंवर लावण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वी पनवेल कोर्टात निशिकांत मोरे यांच्या जामिनाची सुनावणी असताना साळवे यांनी मुलीच्या वडीलांच्या जवळ जात 'शांत रहेनेका, मैं उद्धव ठाकरे का ड्रायव्हर हूं' अशा शब्दात धमकी दिली होती. धमकी दिल्याच्या विरोधात सदर मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. अखेर साळवे यांना आज निलंबित करण्यात आले आहे. गेल्या 15 दिवसापासून काॅनस्टेबल असलेले दिनकर साळवी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत. निशिकांत मोरेला दिनकर साळवी गेल्या 15 वर्षापासून ओळखत आहे, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
दरम्यान, डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टानं फेटाळला आहे. तसेच हायकोर्टात अपील करण्यासाठी कोणताही दिलासा नाही. निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद आज पूर्ण झाला. या प्रकरणात पुढील तपासासाठी डीआयजी मोरेंची अटक आवश्यक असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं. परिचयातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरेंवर आरोप आहे. 26 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून डीआयजी मोरे फरार आहेत.
पीडित मुलगीही सुसाईड नोट लिहून घरातून बेपत्ता झाल्याची कुटुंबियांची माहिती आहे. मात्र अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत गायब झाल्याचा दावा आरोपी मोरेंच्यावतीनं कोर्टात करण्यात आला आहे. मोरे यांच्या पत्नीसोबत पीडितेच्या कुटुंबियांचे आर्थिक व्यवहार फिसकटल्यानं मोरेंविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मोरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पीडितेचे कुटुंबिय जामिनावर बाहेर आहे.
काय आहे प्रकरण
5 जून 2019 रोजी निशिकांत मोरे हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी तिच्या वाढदिवासानिमित्त जमले होते. त्यावेळी केक कापण्याच्या घटनेवरून मोरेंवर हा विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी 26 डिसेंबर रोजी नवी मुंबईतील तळोजा पोलीस स्थानकांत पुणे पोलिसांच्या परिवहन शाखेत डिआयजी असलेल्या निशिकांत मोरेंविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस-याच दिवशी अल्पवयीन पीडित मुलगी सुसाईड नोट लिहून तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिनं मोरेंच्या त्रासाला कंटाळून जीव द्यायला जात असल्याचा उल्लेख केला आहे. पोलिसांची पाच विशेष पथकं सध्या मुलीचा सर्वत्र शोध घेत आहेत.