नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेतही त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. कारण, काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 23 जागा मिळाल्या आहेत. पण बहुमतापासून हे दोन्ही पक्ष दूर आहेत. शिवसेनेला सात तर राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळं शिवसेना कुणासोबत जाणार यावर जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येणार, हे अवलंबून असणार आहे. राज्यातील सत्ता समीकरण लक्षात घेता महाविकास आघाडी सत्तेत येणार की शिवसेना आपल्या जुन्या मित्रासोबत जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या निकालात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून निसटता पराभव झाला आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षातील घराणेशाही दिसून आली त्यात भाजपा नेते विजयकुमार गावित यांच्या परिवारातील चार सदस्य जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय झाले आहेत तर नवापूर काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांचे दोन्ही बंधू जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर माजी मंत्री पद्माकर वळवी यांची कन्या सीमा वळवी या हे विजयी झाले आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 23 जागांवर विजय मिळवता आला आहे तर भाजपही 23 जागांवर विजयी झाली आहे. शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत तर राष्ट्रवादी तीन जागांवर विजयी झाले आहे. जिल्हापरिषद निवडणुकीपूर्वी नवापूर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली होती. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत या नाट्यात राष्ट्रवादी-भाजप सोबतच राहील असे संकेत दिले जात आहेत. मात्र शिवसेना आपल्याला हवी असलेली पदे जो राजकीय पक्ष देईल त्यासोबत जाईल असे चित्र दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेतील विजयी जागा
काँग्रेस 23
भाजपा 23
शिवसेना 7
राष्ट्रवादी 3
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीची सात वैशिष्ट्ये
विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजप आणि सेनेत गेले त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पक्षात नेतृत्व राहिले नव्हते. काँग्रेसचे नेते आणि मंत्री के सी पाडवी माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार शिरीष नाईक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत संघर्ष करत काँग्रेसला सर्वाधिक 23 जागा जिंकून दिल्या.
नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे 7 उमेदवार जिंकून आलेले आहेत.
भाजपकडून नंदुरबार जिल्ह्यात दोन आमदार एक खासदार असे लोकप्रतिनिधी असून जिल्ह्यातील अनेक काँग्रेसचे दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश केला असला तरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही.
नवापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची आघाडी होती. नवापूर तालुक्यातील दहा गटांपैकी पाच गटात भाजप तर पाच गटात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने निवडणूक लढली होती. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीने तीन जागा जिंकल्या. नवापूर तालुक्यात भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत भाजपा नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या परिवारातील चार सदस्य जिल्हा परिषद निवडणुकीत विजय झाले आहेत. त्यात त्यांची पत्नी, दोन पुतणे आणि भावाची पत्नी तसेच आर. गावित परिवारातील सदस्य जिल्हा परिषद दिसणार आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढल्याने जिल्हा परिषदेच्या 56 गटात चौरंगी लढती झाल्या. त्यात मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून येते.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हातात आहेत पक्षासोबत जाईल त्या पक्षाचे सत्ता जिल्हा परिषदेवर येईल.
Nandurbar ZP Election | नंदुरबार जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, काँग्रेस-भाजपला प्रत्येकी 23जागा, शिवसेनेच्या हाती सत्तेची चावी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jan 2020 07:12 PM (IST)
राज्यातील सत्ता समीकरण लक्षात घेता महाविकास आघाडी सत्तेत येणार की शिवसेना आपल्या जुन्या मित्रासोबत जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या निकालात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून निसटता पराभव झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -