अकोला : अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे. कारण एकूण 53 जागांपैकी वंचितने 22 जागांवर बाजी मारली आहे. बहुमतासाठी त्यांना 5 जागांची गरज असून चार अपक्ष वंचितला पाठिंबा देणार असल्याची शक्यता आहे. या चार पैकी दोघे जण भारिपचे बंडखोर आहे तर एक जण भारिप समर्थक आहेत. अर्थात वंचितला बहुमतासाठी एक जागेची गरज आहे. त्यामुळं बहुमत गाठण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना कुणाची साथ मिळते? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या पळसोबडे गावात वंचितनं बाजी मारली आहे.


अकोला जिल्हा परिषदेवर परत प्रकाश आंबेडकरांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वीस वर्षांपासून आंबेडकरांची अकोला जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये भारिप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपल्या जागा वाढविल्या आहे. तर जिल्ह्यातील पाचपैकी चार आमदार असणाऱ्या भाजपच्या जागा अकरावरून सातवर आल्या आहेत. तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे केंद्रात राज्यमंत्री आहे.

विजयी झालेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये भारिपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सुलताने, शिवसेनेचे उपजजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गजानन पुंडकरांचा समावेश आहे. तर प्रमुख पराभूतांमध्ये वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू ढोरे यांच्या पत्नीचा समावेश आहे.

Akola ZP Election | अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचित आघाडीची सत्तेकडे वाटचाल | ABP Majha



केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकरांचं गाव असणाऱ्या पळसोबडे गावातून भारिपच्या उमेदवारांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत विजय झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतलेल्या दगडपारव्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. तर चोहोट्टाबाजार येथे भारिपचा उमेदवार विजयी झाला आहे.

जिल्हा परिषदेपाठोपाठ भारिपनं सातपैकी सर्वाधिक पंचायत समित्यांवर सत्ता स्थापन केली आहे. सर्वात मोठ्या अकोला पंचायत समितीवर भारिपनं स्पष्ट बहुमत मिळवल आहे. यासोबतच बाळापूर, तेल्हारा आणि अकोट पंचायत समितीही भारिपच्या ताब्यात गेली आहे. शिवसेनेनं पातूर पंचायत समितीवर सत्ता राखली आहे. तर त्रिशंकू असलेल्या मुर्तिजापूरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता आहे.

एकूण जागा : 53 
शिवसेना -12

भारिप - 22

भाजप - 07

राष्ट्रवादी - 03

काँग्रेस - 05

अपक्ष - 04


संबंधित बातम्या :