धुळे : जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत 56 जागांपैकी 39 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसला 7, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 तर शिवसेनेने 4 जागा मिळवल्या आहेत. याशिवाय 3 अपक्ष उमेदवार यात विजयी झाले आहेत. या निकालानंतर बहुमतांची 29 जागांची मॅजिक फिगर पार करून 39 जागा मिळवत भाजपने निर्विवाद बहुमत प्राप्त केलं आहे. धुळे जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली आहे. धुळे जिल्हा परिषदेवर यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.


राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर धुळे जिल्हा परिषदेत सुद्धा महाविकास आघाडीचीच सत्ता येईल अशी चर्चा होती. मात्र विधानसभा निवडणुकीत जनमताचा कौल असताना देखील भाजप सत्तेपासून का दूर राहील. ज्यांच्याकडे बहुमत नाही ते सरकार कसं बनवितात, जनमताचा या महाविकास आघाडी सरकारनं कसा अपमान केलाय, शेतकरी कर्जमाफी कशी फसवी आहे हे भाजपने मतदारांना प्रचारादरम्यान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.


जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रथमच धुळे जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे हे दोघे धुळ्यात मुक्कामी होते. भाजपच्या वतीनं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारसभा झाल्यात. महाविकास आघाडीच्या वतीनं मंत्री धनंजय मुंडे, आशिष देशमुख, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, तसेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्या सभा झाल्या आहेत.


मतदारांनी अखेर आपला कौल हा भाजपला दिल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे मुक्कामाचे फलित जिल्हा परिषदेवर भाजपची प्रथमच धुळे जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता मिळवण्यात भाजपला प्राप्त झाले. तर महाविकास आघाडीच्या पदरी निराशा आली. काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांचा हा विजय , हा भाजपचा विजय नव्हे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे.


संबंधित बातम्या : 


Nandurbar ZP Election | नंदुरबार जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, काँग्रेस-भाजपला प्रत्येकी 23जागा, शिवसेनेच्या हाती सत्तेची चावी


Akola ZP Election Result : अकोला जिल्हा परिषदेत वंचित सर्वात मोठा पक्ष, सत्ता वंचितकडे राहण्याची शक्यता


ZP Election : राज्यातील सहा जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर, महाविकासआघाडीची सरशी


शिवसेनेच्या दोन नाराज आमदारांकडून जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचाच पराभव?