पंतप्रधान मोंदींना राजकारणात आणणारे मधुभाई कुलकर्णी यांचं निधन, संघाचा जेष्ठ प्रसारक हरपला
1984 ते 1996 या कालखंडात ते गुजरातचे प्रांत प्रचारक होते. 1996 ते 2003 या काळात त्यांनी पश्चिम क्षेत्राचे प्रचारक म्हणून काम केले.

Chhatrapati Sambhajinagar: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधूभाई कुलकर्णी यांचे आज, गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता वृद्धपकाळामुळे छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 88 वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय क्षेत्रात आणण्यात मधूभाईंचा सिंहाचा वाटा होता. (Madhubhai Kulkarni Passed Away)
दोन आठवड्यांपूर्वीच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत डॉ. हेडगेवार रुग्णालयात भेटीस गेले आणि मधुभाई कुलकर्णी यांची प्रकृती विचारपूस केली होती. मधुभाईंना 1985 मध्ये गुजरातमध्ये प्रांत प्रचारक म्हणून नेण्यात आले होते. त्या काळात त्यांनी संघ प्रचारक असलेल्या नरेंद्र मोदींना भाजपमध्ये सक्रिय केले. यानंतर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि पुढे भारताचे पंतप्रधान झाले.
संघाच्या स्थापनेपासून आजतागायत शतकी वाटचालीचे साक्षीदार
मधूभाई कुलकर्णी यांचा जन्म 17 मे 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण चिकोडी येथे झाले होते. चिकोडी येथे वास्तव्य करत असताना ते संघाच्या शाखेत जाऊ लागले. संघाच्या स्थापनेपासून आजतागायत सुरू असलेल्या शतकी वाटचालीचे ते साक्षीदार होते. कोल्हापुरातून 1954 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मधूभाई महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईला गेले. बीए आणि बीएड्.चे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी सेल्स टॅक्स विभागात नोकरी केली. त्यानंतर त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.
मधुभाई कुलकर्णींची ओळख
महाराष्ट्राच्या जळगाव येथून तालुका प्रचारक म्हणून त्यांनी 1962 मध्ये कार्य सुरु केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा प्रचारक, सोलापूरचे विभाग प्रचारक, पुण्याचे महानगर प्रचारक म्हणून त्यांच्याकडे दायित्व होते. 1984 ते 1996 या कालखंडात ते गुजरातचे प्रांत प्रचारक होते. 1996 ते 2003 या काळात त्यांनी पश्चिम क्षेत्राचे प्रचारक म्हणून काम केले. तसेच 2003 ते 2009 या काळात ते संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते. या काळात त्यांचे वास्तव्य तत्कालीन आंध्रप्रदेशच्या हैदराबाद येथे होते. वयोमानामुळे 2015 पासून ते दायित्वमुक्त होऊन छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्याला होते. अलिकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी 2 आठवड्यापूर्वीच त्यांची प्रत्यक्ष भेट घेत प्रकृतीची चौकशी केली होती. परंतु, आज, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मधूभाईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी समर्पण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ठेवण्यात आले आहे. त्यांनी देहदान केले आहे. त्यांचे पार्थिव रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, आर के दमाणी मेडिकल कॉलेज येथे सोपविले जाणार आहे
























