Maratha Reservation Committee : मराठा आरक्षण समिती 11 ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर; पाहा कोणत्या जिल्ह्यात कधी करणार दौरा?
maratha Reservation : विशेष म्हणजे, नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन देखील या समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेली समिती 11 ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या (Marathwada) दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. तसेच स्थानिक प्रशासने आतापर्यंत शोधलेल्या कुणबी नोंदीचा देखील आढावा घेतल्या जाण्याच्या शक्यता आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन देखील या समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे 11 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा (मराठवाडा) जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.
या दौऱ्या दरम्यान समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे या दौऱ्यातून तरी सरकारच्या हाती काही लागणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
समितीच्या बैठकीचे वेळापत्रक
- समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे.
- त्यानंतर जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता बैठक घेण्यात येणार आहे.
- 16 ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता समितीची बैठक होणार आहे.
- त्यानंतर हिंगोली येथे दि.17 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार आहे.
- नांदेड येथे दि. 18 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता ही बैठक होणार आहे.
- लातूर येथे 21 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता बैठक होईल.
- धाराशिव येथे 22 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार आहे.
- तर बीड येथे 23 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.
कागदपत्रे गांभीर्याने पडताळून तपासून शोधावीत
मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य असलेले निझामकालीन पुरावे, महसुली पुरावे, निझामकाळात झालेले करार, निझामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी व इतर महत्त्वाची आवश्यक ती कागदपत्रे तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेखात अर्थात भूमि अभिलेख कार्यालयाच्या दस्त यामध्ये मिळण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेता त्यासंदर्भातील आवश्यक ती नोंद असलेली कागदपत्रे गांभीर्याने पडताळून तपासून शोधावीत, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : ऐतिहासिक विजय जवळ आलाय, सरकारला सुटका नाहीच; नांदेडच्या सभेतून जरांगेंचा इशारा