Chhatrapati Sambhaji Nagar Crime : जुन्या वादाची खुन्नस, थेट मित्रावर कात्रीने वार; ओळख लपवण्यासाठी तोंडावर बांधला रुमाल
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात एकावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याबाबत कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) कन्नड तालुक्यात एकावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील सिरजगाव येथे ही घटना घडली असून, जुन्या वादातून मित्रावरच मित्राने कात्रीने वार केल्याचं हा प्रकार आहे. ही घटना 13 मे रोजी मध्यरात्री घडली आहे. याबाबत कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पदम रामचंद्र सोनेत (वय 24 वर्षे) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गोपाल छन्नसिंग तस्सीवाल (वय 27 वर्षे) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिरजगाव येथील पदम रामचंद्र सोनेत हा तरुण शेतजमीन (गट क्र 192) मध्ये कुटुंबियांसह राहतो. दरम्यान 13 मे रोजी रात्री तो घराबाहेर बाजेवर झोपला असताना मध्यरात्री अडीच वाजता तोंडावर रुमाल बांधलेल्या एकाने त्यांच्या मानेवर कात्रीने वार केला. दुसरा वार सोनेत याने अडवून त्या व्यक्तीला लाथ मारली. त्यामुळे तो व्यक्ती खाली पडल्याने त्याच्या चेहऱ्यावरील रुमाल सुटला. तर हल्ला करणारा व्यक्ती गावातीलच गोपाल छन्नसिंग तस्सीवाल असल्याचे पदम यांना दिसले. त्यांनी आरडाओरड करताच घरात झोपलेले त्यांचे भाऊ बाहेर आले. तेव्हा त्यांनीही गोपाल तस्सीवालला पळताना पाहिले. तर जखमी पदम सोनेत यांच्यावर कन्नड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथे पाठवण्यात आले आहे.
याबाबत पदम सोनेत याने दिलेल्या तक्रारीवरुन गोपाल तस्सीवाल विरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपास पोलीस उपनिरीक्षक सागर राजपूत यांनी करुन आरोपीस अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुन्या वादावरुन केला हल्ला...
दरम्यान हल्लेखोर तरुण गोपाल तस्सीवाल हा गावातच केशकर्तनाचा व्यवसाय करतो. मागील वर्षी पदम सोनेत यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो गावातील मित्रांसोबत चापानेर येथे गेला होता. त्याठिकाणी दोघांमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून गोपालचे पदम सोनेत यांच्याशी वागणे बदलले होते. तर जुन्या भांडणावरुन ही घटना घडल्याचे पदम सोनेत यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
थोडक्यात वाचला जीव...
पदम सोनेत आपल्या शेतात झोपले असताना अचानक त्यांच्यावर कात्रीने गोपालने हल्ला केला. मात्र पहिला वार झाल्यावर पदम झोपेतून उठले आणि त्यांनी लगेचच दुसरा वार वाचवला. तसेच गोपालला लाथ मारली. त्यामुळे त्यांच्यावर मानेवर होणार दुसरा वर वाचला आणि त्यांचा थोडक्यात जीव वाचला. जर गोपालने दुसरा वार देखील मानेवर केला असता तर पदम यांचा जीव देखील जाऊ शकत होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर पोलिसांकडून शहरात रेड अलर्ट