Ambadas Danve : गद्दारांना वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही; अंबादास दानवेंचा शिंदे गटावर टीका
Ambadas Danve : गद्दारांनी त्यांच्या मायबापांचा शोध घ्यावा आणि त्यानंतरच शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करावा अशी घणाघाती टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
Ambadas Danve On Shinde Group: शिवसेना पक्षाचं 19 जून रोजी वर्धापन दिन आहे. मात्र वर्षभरापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे यावर्षी होणारे शिवसेना पक्षाचं वर्धापन दिन देखील दोन होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावरून दोन्ही गटाच्या प्रतिक्रिया येत असताना ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. गद्दारांना वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही, असा खोचक टोला दानवे यांनी लगावला लगावला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची कमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात सोपवली आहे. त्यामुळे शिवसेनेचे जन्मदाते आमचे मायबाप आहे. त्यामुळे गद्दारांनी त्यांच्या मायबापांचा शोध घ्यावा आणि त्यानंतरच शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करावा, असे प्रखर टीकास्त्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली आहे.
शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाव्यापी शिवगर्जना मोहीम सुरू करण्यात येणार आहे. 'आता जिंकेपर्यंत लढायचं' या संपर्क मोहिमेचे 1 जून ते 15 जुलै पर्यंत आयोजन करण्यात आले असून, या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्कल निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही दानवे यांनी दिली आहे. तर या संपर्क मोहिमेत पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सोबतच आरोग्य केंद्रांना भेटी, वस्तीगृहांना भेटी, प्रशासकीय अधिकारी कार्यालय भेटी, त्या त्या विभागातील नागरिकांच्या भेटी घेऊन तेथील समस्यांची माहिती घेण्यात येणार असल्याचे देखील दानवे म्हणाले.
एक लाख शिवसैनिकांचा डाटा तयार करणार...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 45 हजार शिवसैनिकांचा डाटा तयार आहे. या निमित्ताने आणखी एक लाख शिवसैनिकांचा डाटा तयार करण्यात येणार आहे. शिवसैनिकांनी मिस कॉल देऊन लोकांना जोडण्याचे काम या महिन्याभरात करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, मनपा आणि नगरपालिका निवडणुकीची संघटनात्मक बांधणी देखील करण्यात येत असल्याचे दानवे यांनी सांगितले. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला महिला आघाडी संपर्कप्रमुख आमदार मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या शिवगर्जना मोहिमेत आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, किशनचंद तनवाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे देखील दानवे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tab Scam: मंत्री संदिपान भूमरेंच्या खात्यात टॅब घोटाळा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप