व्हिडिओ: दानवेंच्या समोरच त्यांच्याच मतदारसंघातील 'जल जीवन मिशन' योजनेची जेव्हा जलील पोलखोल करतात...
Aurangabad : औरंगाबादमधील मंत्र्यांच्या मतदारसंघात 'जल जीवन मिशन' योजनेअंतर्गत झालेल्या कामांची आकडेवारी जलील यांनी यावेळी मांडली आहे.
औरंगाबाद : सरकारने मोठा गाजावाजा करत 'जल जीवन मिशन' योजनेची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात या योजनेला गती मिळत नसल्याचे चित्र असून, मंत्र्यांच्याच मतदारसंघात या कामांना ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याच 'जल जीवन मिशन' (Jal Jeevan Mission)योजनेची औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासमोरच त्यांच्याच मतदारसंघाची पोलखोल केली. औरंगाबादमधील (Aurangabad) मंत्र्यांच्या मतदारसंघात 'जल जीवन मिशन' योजनेअंतर्गत झालेल्या कामांची आकडेवारी मांडत जलील यांनी योजना कशी फसली याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे दानवे यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या पैठण आणि सिल्लोड मतदारसंघातील आकडेवारी यावेळील जलील यांनी मांडली. दिशा समितीची बैठक सोमवारी औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी सभागृहात पार पडली, यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना जलील यांनी आपली भूमिका मांडली.
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये सर्वांना ‘हर घर नल से जल’, तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना परवडेल अशा घराची निर्मिती या योजनांचा गती देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. दरम्यान याच बैठकीनंतर दानवे माध्यमांशी बोलत असतानाच यावेळी जलील यांनी देखील आपली भूमिका मांडली.
दरम्यान यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, 'जल जीवन मिशन' योजनेअंतर्गत हर घर नलची घोषणा झाली. पैठण तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 178 गावं आहेत. याचा वर्कआर्डर ऑक्टोबर 2022 मध्ये निघाला आहे. मात्र, आतापर्यंत फक्त 4 टक्के काम झाले आहेत. दुसरं म्हणजे सिल्लोड तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 108 गावांची निवड झाली. येथील देखील 2022 मध्येच टेंडर निघाले. पण काम 03.07 टक्केचं काम झाले आहेत. विशेष म्हणजे पैठण तालुका मंत्री संदिपान भुमरे आणि सिल्लोड तालुका मंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे. तर हे दोन्ही तालुके केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघाचे भाग आहेत.
पैसे असूनही कामे होत नाही...
पुढे बोलतांना जलील म्हणाले की, तुम्ही कंत्राटदारांना फाशीवर लटकवा, पण लोकांना पिण्यासाठी पाणी द्या. आता पैसे असूनही देखील फक्त तीन आणि चार टक्के काम होत असतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, पूर्ण काम होण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न जलील यांनी यावेळी उपस्थित केला.
इतर महत्वाच्या बातम्या: