ग्रामीण भागात रेल्वे थांबा मिळेना, मग केंद्रीय मंत्रीपदाचा मराठवाड्याला काय फायदा? इम्तियाज जलील यांचा सवाल
Aurangabad : तेज कनेक्टिविटी आणि रेल्वेच्या उत्पन्नाचा मुद्दा पुढे करत ग्रामीण भागात रेल्वे थांबा देण्यास थेट नकार देण्यात आला आहे.
औरंगाबाद : मराठवाड्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद असताना मराठवाडा व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची रेल्वे थांबा देण्याची छोटीशी मागणी पूर्ण होत नाही. मग अशा मंत्रीपदाचा काय उपयोग? रेल्वे कोणासाठी आहे? रेल्वे विभागाला फक्त व्यवसाय करायचा आहे?, गोरगरीबांशी काहीच देणे-घेणे नाही?, एक्सप्रेस गाड्या ग्रामस्थांना नाही का? अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील ग्रामीण भागातील परसोडा व इतर ठिकाणी रेल्वे गाडी थांबविण्यात यावी याकरिता कामगार, शेतकरी बांधव, ग्रामस्थ व विविध संघटनांनी रेल्वे विभागाला अनेक निवेदने दिले आहेत. मात्र, तरी सुध्दा काहीच कार्यवाही होत नसल्याने या सर्वांनी थेट खासदार इम्तियाज जलील यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची होणारी गैरसोय व व्यथा मांडली. त्यानअनुषंगाने खासदार जलील यांनी रेल्वे विभागाला प्रवाश्यांच्या मागणीप्रमाणे रेल्वे थांबा देवुन सुविधा देणेबाबत कळविले होते. परंतु, दक्षिण रेल्वे विभागाचे मुख्य व्यवस्थापक अरुण कुमार जैन यांनी तेज कनेक्टिविटी व रेल्वेच्या उत्पन्नाचा मुद्दा पुढे करत ग्रामीण भागात रेल्वे थांबा देण्यास थेट नकार दिला व तसे पत्र ही खासदार जलील यांना पाठविले.
धर्माबाद मनमाड मराठवाडा, निजामाबाद-पूणे, हैदराबाद-औरंगाबाद आणि पूर्णा- हैदराबाद रेल्वे गाड्यांना परसोडा व इतर ठिकाणी थांबा देणे गरजेचे आहे. कोरोना काळापूर्वी रेल्वे ग्रामीण भागात विविध ठिकाणी थांबत होत्या. यापूर्वी कोरोनाचे कारण देत रेल्वे विभागाने ग्रामीण भागातील थांबा बंद केले. कोरोना परिस्थिती पूर्णपणे संपल्यानंतर रेल्वेगाड्या पूर्ववत ग्रामीण भागात थांबविणे आवश्यक होते. परंतु तसे न करता थेट ग्रामस्थांची मागणीला रेल्वे विभागाने स्पष्ट नकार दिल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली.
मंत्रीपदाचा काय उपयोग?
दरम्यान याच मुद्यावरून जलील यांनीरेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठवाड्याला रावसाहेब दानवे यांच्या रूपाने केंद्रीय रेल्वे मंत्री पद असतांना मराठवाडा व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाश्यांची रेल्वे थांबा देण्याची छोटीशी मागणी पूर्ण होत नाही. मग अशा मंत्री पदाचा काय उपयोग? असा सवाल जलील यांनी केला आहे. विशेष म्हणजे रल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेज कनेक्टिविटी व रेल्वेच्या उत्पन्नाचा मुद्दा पुढे करत ग्रामीण भागात रेल्वे थांबा देण्यास थेट नकार दिला असल्याने जलील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ: दानवेंच्या समोरच त्यांच्याच मतदारसंघातील 'जल जीवन मिशन' योजनेची जेव्हा जलील पोलखोल करतात...