मोठी बातमी! संभाजीनगरात प्रचंड वाहतूक कोंडी, जालना रोड पूर्णपणे 'ब्लॉक'; बागेश्वर धाम बाबांच्या कार्यक्रमाचा फटका
Chhatrapati Sambhaji Nagar : शहरातील क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप, नगर नाका, रेल्वे स्टेशन परिसरात ट्राफिक जाम झाली आहे. अनेक ठिकाणी तासाभरापासून नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरात अचानक वाहतूक कोंडी झाली असून, जालना रोडच्या दक्षिणेकडील भागातील सर्वच रस्त्यांवर गाड्या ट्राफिकमध्ये अडकल्या आहेत. शहरातील मुख्य मार्ग असलेला जालना रोड पूर्णपणे 'ब्लॉक' झाला असल्याचे चित्र आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात बागेश्वर धाम बाबा ऊर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, याचा मोठा फटका शहरवासियांना बसतांना पाहायला मिळत आहे.
बागेश्वर धाम बाबा ऊर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या श्री राम, श्री हनुमान कथेला आजपासून रेल्वेस्टेशन येथील अयोध्यानगरी मैदानावर प्रारंभ होत आहे. रविवारी रात्री आठ वाजता महाराजांचे विमानतळावर अगमन झाले. दरम्यान, आजपासून तीन दिवस बाबांचा दरबार भरणार आहे. त्यामुळे पोलिसांनी काही मार्ग बंद ठेवण्याचे आदेश काढले आहे. मात्र, यामुळे शहरातील एक भाग पूर्णपणे 'ब्लॉक' झाला आहे. बीड बायपासकडून शहरात येणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत असून, रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. शहरातील क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप, नगर नाका, रेल्वे स्टेशन परिसरात ट्राफिक जाम झाली आहे. अनेक ठिकाणी तासाभरापासून नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आहे. विशेष म्हणजे आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने नागरिक अनेक कामा निमित्ताने घर बाहेर पडतात, मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर, शाळेतून मुलांना वेळेपूर्वी घेऊन जा असेही काही पालकांना शाळेकडून सांगण्यात आले आहे.
वाहतूकीस बंद करण्यात आलेल मार्ग...
- बाबापंप ओव्हरब्रीज वरून रेल्वेस्टेशनकडे जाणारा व येणारा रोड बंद राहील
- पंचवटी ते रेल्वेस्टेशन ओव्हरब्रीजखालून जाणारा रोड बंद राहील
- रेल्वेस्टेशन ते पंचवटी चौकाकडे ओव्हरब्रीज खालून येणारा रोड बंद राहील
- कोकणवाडी ते रेल्वेस्टेशन जाणाऱ्या रोडवरील बन्सीलालनगर कमान पासून ते आयोध्यानगरी पर्यंत जाणारा रोड बंद राहील
पर्यायी मार्ग
- कार्तिकी चौकाकडून बाबापंप ओव्हरब्रीजवरून रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहने, बाबा पेट्रोलपंप, सेशन कोर्ट, कोकणवाडीमार्गे अथवा क्रांतीचौक मार्गे रेल्वेस्टेशनकडे जातील.
- रेल्वेस्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे येणारी वाहने, रेल्वेस्टेशन, कोकणवाडी, सेशनकोर्ट, सावरकर चौक, कार्तिकी चौक मार्गे येतील.
- लोखंडीपुलाकडून रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहने, लोखंडी पुल, पंचवटी चौक, कोकणवाडी चौक मार्गे रेल्वेस्टेशनकडे जातील.
नागरिकांमध्ये नाराजी...
आज सोमवार असल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी नागरिक वेगवेगळ्या कामानिमित्त घर बाहेर पडतात. मात्र, आज सकाळपासून शहरातील वेगवेगळ्या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही कार्यक्रमाचा सर्वसामान्यांना नाहक त्रास होऊ नयेत अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: