एक्स्प्लोर
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत लढवायची आहे का?; जाणून घ्या सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी असलेली पात्रता व अपात्रता सोप्या भाषेत
Gram Panchayat Election : राज्यात 16 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यात येणार आहेत.
Gram Panchayat Election Eligibility : सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची (Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. 16 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी असलेली पात्रता व अपात्रता सोप्या आणि मोजक्या शब्दात समजून घेऊ यात.
ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे
- नामनिर्देशनपत्र सादर करण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या अंतिम दिनांकास त्या व्यक्तीचे वय 21वर्षांपेक्षा कमी नसावे.
- ग्रामपंचायतीच्या विद्यमान मतदार यादीमध्ये त्या व्यक्तीचे नाव समाविष्ट केलेले असावे.
- कोणत्याही कायद्याखाली अशा व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र (अनर्ह) ठरविण्यात आलेले नसावे.
- जी व्यक्ती 1 जानेवारी, 1995 रोजी वा त्यानंतर जन्मलेली असेल, अशा व्यक्तींकडे किमान शालेय शिक्षणातील 7 वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय निवडणूक लढविता येणार नाही.
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार एकापेक्षा जास्त प्रभागामध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकते. परंतु एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवू शकत नाही.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग यांच्याकरीता राखीव असलेल्या जागेवरील निवडणूक लढविण्यासाठी संबंधित व्यक्तीने नामनिर्देशनपत्राबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- स्त्रियांसाठी राखीव असलेल्या जागांवर सर्व पात्र स्त्रिया अर्ज सादर करु शकतील. परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग याप्रवर्गातून महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर त्या त्या प्रवर्गातीलच महिला आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करु शकतील.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरीत झाले असल्यास त्या व्यक्तींनी ग्रामपंचायत निवडणुकामध्ये त्या जातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून नामनिर्देशनपत्र जरी दाखल केले असले तरी त्यांना निवडणूक लढविता येणार नाही.
ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवाराला लागू असलेल्या अपात्रतेच्या तरतुदी
- एखाद्या व्यक्तीस राज्य विधानमंडळाने कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र ठरविले असेल. तर अपात्रतेचा कालावधी संपेपर्यंत ती व्यक्ती स्थानिक ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकणार नाही.
- एखाद्या व्यक्तीला मुंबई दारूबंदी अधिनियम, 1949 अन्वये दोषी ठरविले असेल व त्यानंतर पाच वर्षांचा कालावधी संपला नसेल किंवा शासनाने त्यामध्ये सूट दिली नसेल तर अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही.
- एखाद्या व्यक्तीला इतर अपराधाबाबत न्यायालयाने दोषी ठरविले असेल व तिला 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कारावसाची शिक्षा झाली असेल व कारावासातून मुक्त झाल्यापासून पाच वर्षांचा कालावधी संपत नसेल किंवा शासनाने त्यामध्ये सूट दिली नसेल अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही.
- जर एखाद्या व्यक्तीला अपराधसिद्धीनंतर जामिनावर सोडले असेल परंतु तिचे अपील निकालात काढण्यासाठी प्रलंबित असेल तर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ती व्यक्ती निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरेल. परंतु तिच्या अपराधसिद्धीलाही स्थगिती दिली असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते.
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (आय) नुसार एखाद्या व्यक्तीने शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कर्मचारी असेल तर त्या व्यक्तीस ग्रामपंचायत निवडणूक लढविता येत नाही.
- एखाद्या व्यक्तीने शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणतेही पद धारण केले असून, तिला गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले असेल तर ती व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही.
- एखाद्या व्यक्तीकडे ग्रामपंचायतीची, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची कोणत्याही प्रकारची थकबाकी देय असेल आणि ती थकबाकी देण्याविषयी कसूर करेल तर अशा व्यक्तीस निवडणूक लढविता येणार नाही.
- जी व्यक्ती पंचायतीच्या नियंत्रणाखाली वेतनीपद किंवा लाभाचे पद धारण करीत असेल अशी व्यक्ती असे पद धारण करीत असलेल्या मुदतीत निवडणूक लढवू शकत नाही.
- एखाद्या व्यक्तीने तिचा ग्रामपंचायतीच्या कामात, करारात, सेवेत स्वत: किंवा भागीदारामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग किंवा हितसंबंध असेल अशी व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरेल.
- अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक असली तरी अशी व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार नाही.
- जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून किंवा पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून आल्यास अशी व्यक्ती ग्रामपंचायतीचा सदस्य राहणार नाही.
- ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केलेले आहे, अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही.
- एखाद्या व्यक्तीस भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा हिशेबाच्या मुद्यावरून अपात्र ठरविले असेल तर ती व्यक्ती अपात्रता आदेशाच्या कालावधीमध्ये पुन्हा निवडणूक लढवू शकणार नाही.
- खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेतील शिक्षक, कर्मचारी यांना निवडणूक लढविता येते. स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी, शिक्षक यांना निवडणूक लढविता येणार नाही.
- परकीय राष्ट्राचे नागरिकत्व संपादन केलेली व्यक्ती ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकणार नाही.
- एखाद्या व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य पदावरून आयुक्ताने दूर केले असेल तर अशा रितीने दूर करण्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांचा कालावधी संपल्याशिवाय ती व्यक्ती निवडणूक लढविण्यास पात्र होवू शकत नाही.
(टीप: ही संपूर्ण माहिती जळगाव जिल्हा निवडणूक शाखा यांच्याकडून देण्यात आली आहे.)
इतर महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement