(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अब्दुल सत्तारांची पुन्हा अडचण वाढणार?, एकाच वेळी पाच फौजदारी तक्रारी दाखल; काय आहे प्रकरण?
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar News : नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणारे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सत्तार यांच्या विरोधात एकाच वेळी पाच फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसून, पोलिसांकडून तक्रारीची प्राथमिक चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कृषी प्रदर्शन भरवण्यासाठी जमिनी सपाटीकरण करून त्यावर अवैधरीत्या ताबा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात एकाच दिवशी पाच फौजदारी तक्रार दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच तक्रारदारांनी मागणी केली आहे की, पोलीस प्रशासनाने अगोदर प्राथमिक चौकशी करावी. तसेच आम्ही दिलेले सर्व पुरावे व प्राप्त पुरावा आधारे दोष सिद्धी अंती गुन्हा दाखल करावा. त्यामुळे आता पोलिसांकडून नेमकी काय कारवाई करण्यात येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मात्र, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास सत्तार यांची अडचण वाढू शकते. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांच्यासह आणखी 25 जणांचा संशयित आरोपी म्हणून तक्रारीत उल्लेख करण्यात आला असून, ज्यात सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार हे महाराष्ट्राचे कृषिमंत्री असताना सन 2022 डिसेंबर महिन्यात सर्वे नंबर 90, 91 व 92 मध्ये सिल्लोड कृषी महोत्सवासाठी नगरपरिषद सिल्लोड मार्फत जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू केले होते. 01 ते 07 जानेवारी 2023 रोजी पर्यंत या जमिनीवर महाराष्ट्र सिल्लोड कृषी महोत्सव साजरा करण्यात आला होता. जमिनीचे सपाटीकरण करतेवेळी सर्वे नंबर 92 मधील मालमत्ताधारक यांच्या भूखंड, प्लॉटच्या खाना-खुणा, हद्दी, माकिंग, कंपाऊंड, बेसमेंट इत्यादीसह जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले होते. सिल्लोड तालुक्यात प्रथमच महाराष्ट्राचा कृषी महोत्सव असल्याकारणाने मालमत्ता धारकांनी सदर कार्यक्रमास कोणत्याही प्रकारे व कसलाही विरोध केला नाही. परंतु कृषी महोत्सव संपल्यानंतर दोन महिन्याने अचानक सदर ठिकाणी नॅशनल एज्युकेशन सोसायटी F- NO. 138 Registration No. AGD9/57 सिल्लोड या शैक्षणिक संस्थेने बनावट व खोट्या कागदपत्रा आधारे प्रचंड मोठे बेकायदेशीर व अनाधिकृत बांधकाम सुरू केले असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तर, या प्रकरणी एकाचवेळी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात पाच फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :