(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एका शेतकऱ्याचे निवेदन, धनंजय मुंडेंची तत्परता अन् संपूर्ण देशात लागू झाली योजना
Drip Irrigation Scheme : देशभरात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित झाले.
छत्रपती संभाजीनगर : अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषिमंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले. धनंजय मुंडेंनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला आणि मुंडेंच्या या तत्परतेने सबंध देशभरात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित झाले. धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल निवेदनकर्त्या शेतकऱ्यासह असंख्य शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.
त्याचं झाले असे की, कृषिमंत्री धनंजय मुंडे हे मागील महिन्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे शिवार फेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी कृषिमंत्री मुंडे यांना निवेदन दिले होते. ज्यात, संत्रा फळ पिकाची गळती झाली असून, फळ बागांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी विनंती अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी देखील शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला. केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. कृषी विद्यापीठातील तज्ञ, ऑटोमेशन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, अनुभवी शेतकरी यांची एक समिती याबाबतचे निकष निश्चित करणार असून, या अहवालानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान मिळणार
या निर्णयानंतर बुलडाणा जिल्ह्यातील सचिन अग्रवाल यांनी याबाबत एक पत्र लिहून धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत. याआधीही धनंजय मुंडे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत संत्रा कलमासाठी प्रति कलम 70 रुपये प्रमाणे अनुदान तसेच सेंद्रिय व रासायनिक खतांसाठी 100% अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता फळ पिकांसाठी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली साठी हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान मिळणार असल्याने फळ उत्पादक शेतकरी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करत आहेत.
निवेदनाचे फलित...
अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी यांना जनतेतून अनेक निवेदने दररोज प्राप्त होत असतात, मात्र बऱ्याच लोकप्रतिनिधींकडे या निवेदनांचे पुढे काय होते, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, धनंजय मुंडे याला याला अपवाद ठरले आहे. एका सामान्य शेतकऱ्याच्या निवेदनाची धनंजय मुंडे व त्यांच्या कार्यालयाने दखल घ्यावी आणि त्यातून एखादी योजना राज्यातच नव्हे तर सबंध देशातील शेतकऱ्यांना लागू व्हावी, हे उदाहरण दखलपात्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: