(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्रपती संभाजीनगरात ९० टक्के खरीप पेरण्या पूर्ण, पुढील पाच दिवस कसे राहणार हवामान? शेतकऱ्यांनी काय करावे?
कृषी विभागाने आज जाहीर केलेल्या पेरणी अहवालानुसार, छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण 90% क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar: राज्यभरात पावसाने सध्या दाणादाण उडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील 5 दिवस हवामान ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र व जिल्हा कृषी हवामान केंद्राने वर्तवली आहे.
कृषी विभागाने आज जाहीर केलेल्या पेरणी अहवालानुसार, छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण 90% क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असून पेरणी झालेली पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर विभागात 90% खरीप पेरण्या
छत्रपती संभाजीनगर विभागात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र 20.90 लाख हेक्टर असून 8 जुलै 2024 पर्यंत जिल्ह्यात 18.91 लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. खरीप हंगामातील बाजरी मका सोयाबीन तूर उडीद मूग कापूस भुईमूग या पिकांच्या पेरण्या प्रगतीपथावर असल्याचेही सांगण्यात आले.
जिल्ह्यात पुढील पाच दिवस कसे राहणार हवामान?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पासून पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडणार असून आकाश ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवार व बुधवारी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता जिल्हा कृषी हवामान केंद्र व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांनी कृषी हवामान सल्ला दिला आहे.
- सोयाबीन, बाजरी, भुईमूग, ज्वारी या पिकामध्ये कोळपणी व खुरपणीची कामे करून घ्यावी.
- खरीप ज्वारीची पेरणी होऊन 30 दिवस झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता 40 किलो प्रती हेक्टरी युरियाद्वारे द्यावा.
- अद्रक पिकात तनव्यवस्थापन करून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बुरशीनाशक द्यावे.
१ जुन ते ८ जुलैपर्यंत झाला ७१.७ टक्के सरासरी पाऊस
राज्यातील पीक पेरणी अहवालानुसार बहुतांश राज्यात आकाश ढगाळ असून छत्रपती संभाजीनगरसह, लातूर विभागात या आठवड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. एक जून ते आठ जुलै या कालावधीत राज्यातील सरासरी पाऊस हा 293 मिमी असून मागील वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत 71.7% पाऊस झाला.
जूनच्या पावसात किती हेक्टरचे नुकसान?
अहवालानुसार जून 2024 मध्ये पावसामुळे शेती व फळ पिकांचे नुकसान झाले असून राज्यात 2592 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच 160 हेक्टर जमीन खरडून गेल्याचे नोंदवण्यात आले.
हेही वाचा:
हिंगोलीत पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक, कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या, पिकविमा मिळेपर्यंत...