Chhatrapati Sambhaji Nagar : पावसाने नागरिकांना त्रास झाल्यास कारवाई; संभाजीनगर मनपा प्रशासकांचा अधिकाऱ्यांना इशारा
पावसाने नागरिकांना त्रास झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा थेट इशाराच आयुक्तांनी दिला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) आलेल्या पहिल्याच पावसात (Rain) महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या नालेसफाईच्या दाव्याचा फज्जा उडाला होता. ज्यात जय भवानीनगर येथील नाल्याला पूर आला आणि त्यामुळे परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान याची गंभीर दखल मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतली आहे. पावसाने नागरिकांना त्रास झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा थेट इशाराच आयुक्तांनी दिला आहे.
मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना प्रशासकांनी सर्वप्रथम शनिवारी पहिल्याच पावसात शहराच्या कोणकोणत्या भागात काय समस्या निर्माण झाल्या त्याबाबत वॉर्ड अधिकारी, अभियंत्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर नालेसफाईच्या कामावर प्रश्न उपस्थित करीत, नाला चोकअप झाल्यानंतर तात्पुरते काम करण्याऐवजी कायमस्वरूपी काम करा, असे आदेश प्रशासकांनी दिले. तसेच पावसाळ्यापूर्वी नाले, ड्रेनेज आणि रस्त्यालगतच्या डक्टच्या दुरुस्ती आणि सफाईचे काम तातडीने पूर्ण करा. घरांत पाणी शिरून नागरिकांना त्रास झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आढावा बैठकीत दिला.
तसेच 9 झोन कार्यालयांसाठी 9 पालक अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, आर. एन. संधा, उपायुक्त अपर्णा थेटे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, उप अभियंता विद्युत मोहिनी गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख स्वप्नील सरदार, प्रसिद्धिप्रमुख तौसिफ अहमद यांची उपस्थिती होती.
धोकादायक इमारतींची सर्व्हे करण्याच्या सूचना...
याच बैठकीत, धोकादायक इमारतींची सर्व्हे करण्यात यावा, या पावसाळ्यात एकाही भागातील नागरिकांना त्रास होणार नाही, कुठेही जीवित व वित्त हानी होणार नाही, याची काळजी प्रत्येक अधिकाऱ्याने घ्यावी. नसता जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. या बरोबरच शहराच्या विविध भागांतील ट्राफिक सिग्नलवर डाव्या बाजूंचे टर्न मोकळे करण्यात यावेत. यात प्रामुख्याने सेव्हनहिल ते गजानन महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील लेफ्ट टर्न मोकळे करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले.
पहिल्याच पावसात नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल
शनिवारी झालेल्या पहिल्याच पावसामुळे महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल पाहायला मिळाली. कारण शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरातील जय भवानीनगर येथील नाल्याला पूर आला. त्यामुळे परिसरात साचलेले पाणी काही नागरिकांच्या घरात गेले. तर यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. त्यानंतर यांत्रिकी विभागातर्फे या ठिकाणी जेसीबी पाठवत साचलेला पाणी काढण्याचे काम करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या: