तीन वर्षांपासून महानगरपालिका निवडणुका रखडल्या, मग नगरसेवकांवर होणारा खर्च कुठे जातोय?
Chhatrapati Sambhaji Nagar News : महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने त्यांच्यावर होणारे खर्चाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत संपली असल्याने या ठिकाणी सध्या प्रशासकच सर्व कारभार पाहत असल्याची परिस्थिती आहे. निवडणुका होत नसल्याने शहरांचा विकास खुंटला असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) देखील मुदत संपवून तीन वर्षे उलटले आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा कारभार मनपा आयुक्त पाहत आहे. तर महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने त्यांच्यावर होणारे खर्चाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे नगरसेवकांवर होणारा खर्च विकास कामांसाठी वापरण्यात आल्याने साडेअकरा कोटी रुपयांची तीन वर्षात बचत झाली असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. आयुक्तांचा हा दावा चुकीचा असल्याचं मत माजी महापौर यांच्यासह माजी नगरसेवकांनी मांडले आहे.
न्यायालयात खटला सुरू असल्याने छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून खोळंबल्या आहेत. या दरम्यानच्या काळात जनरल बॉडी मीटिंग, नगरसेवक, महापौर आणि उपमहापौर यांच्यावर होणारा सुमारे अकरा कोटींचा खर्च वाचला आहे. मात्र ही रक्कम तिजोरीमध्ये जमा न ठेवता या रकमेचे ज्या विभागाला गरज आहे, त्या विभागाकडे वळून यातून अनेक विकास कामे शहरात होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. यामध्ये रस्ते असतील, ड्रेनेज असतील किंवा इतर काही विकास कामे होत आहेत असेही आयुक्त म्हणाले.
साडेअकरा कोटी कसे वाचले?
- नगरसेवकांना प्रति महिना मिळतो 7 हजार रुपये भत्ता.
- दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे शंभर रुपये अतिरिक्त भत्ता.
- महापौर आणि उपमहापौर, सभागृह नेता विरोधी, पक्ष नेता स्थायी समितीचा अध्यक्ष, यांना दरमहा मिळतात 40 हजार रुपये.
- छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण 115 नगरसेवक आहेत.
- या सर्वांची बेरीज केल्यास सुमारे अकरा कोटी रुपये या तीन वर्षात महापालिकेच्या तिजोरीतून वाचले आहेत.
- विशेष म्हणजे वाचलेल्या या पैशातून शहरातील विकास कामे देखील झाले आहेत.
आमच्या काळात पैसे खाऊन भ्रष्टाचार झाला का?
सध्या महापालिकेवर प्रशासक राज आहे. मात्र नगरसेवक आणि महापौर नसल्याने यांच्यावर होणाऱ्या खर्चातून शहरात अनेक विकास कामे झाली असल्याचे म्हणणे चुकीचे ठरेल. जर असे असेल तर आम्ही आमच्या काळात पैसे खाऊन भ्रष्टाचार करत होतो का? असा सवाल माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला. तर शहराच्या विकासासाठी प्रशासकाबरोबरच लोकांनी दिलेले लोकप्रतिनिधी सुद्धा गरजेचे असतात. सध्या महापालिकेत प्रशासक असल्याने अनेक अधिकारी कर्मचारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकत आहेत असेही घोडेले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! आता घंटागाडी ट्रॅक करता येणार, फोन करताच गाडी घरासमोर