Chhatrapati Sambhaji Nagar : गाडीचा धक्का लागल्यावरून वाद, बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत; पोलिसांची तत्काळ घटनास्थळी धाव
Chhatrapati Sambhaji Nagar : माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
Chhatrapati Sambhaji Nagar News : दुचाकीचा धक्का मारल्याच्या कारणावरून शुक्रवारी (23 जून) रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) अंगुरीबाग परिसरात तुफान राडा पाहायला मिळाला. एका कुटूंबावर जमावाने हल्ला चढवत घरावर दगडफेक केली. तर विटांच्या प्रहाराने एकजण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली अन दोन्ही बाजूंनी जमाव जमला. दरम्यान याची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. तर याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगुरीबाग परिसरात रात्री घरासमोर उभ्या असलेल्या विजय काथार याला आरोपी सय्यद इरफान याने दुचाकीचा धक्का दिल्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले. हा वाद सुरू असताना इतरही काही जण तिथे आले. आरोपींनी जमाव जमवून घरावर हल्ला चढविला. घरासमोर उभ्या तीन मोटारसायकली तर दोन ॲक्टिव्हा गाड्या फोडण्यात आल्या. आरोपी सय्यद इरफान याने विजय काथार याच्या डोक्यात वीट फेकून मारल्याने तो रक्तबंबाळ झाला. फियादीची वहिनी हर्षाली संजय काथार, भाऊजी सुधाकर काथार तसेच सुनिता काथार, योगिता काथार यांनाही जमावाने शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याने दहशत पसरली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली धाव
दरम्यान घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जमावाला नियंत्रित केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आणि दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले. त्याचबरोबर रात्रीच पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त दिपक गिऱ्हे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला असून सध्या या परिसरात शांतता आहे.
सहा आरोपी ताब्यात...
दरम्यान, दगडफेकीनंतर फरार झालेल्या आरोपींची पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरा पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती क्रांतीचौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. अजूनही काही आरोपींचा शोध सुरू असून परिसरात दंगा नियंत्रण पथकाचा बंदोबस्त लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सद्या शांतता असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
संपूर्ण आंबे विकत घेण्याची थाप मारून फळ विक्रेत्या महिलेची फसवणूक; तब्बल 89 हजाराला लावला चुना