Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्राच्या ब्रँडेड बाटलीत गोव्याची हलकी दारु; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर भांडाफोड
Chhatrapati Sambhaji Nagar : गोव्याची हलकी दारू महाराष्ट्रातील बँडेड बाटलीत भरणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar News : ब्रँडेड दारुच्या नावाखाली बनावट दारु विक्रीचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. दरम्यान असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात देखील समोर आला आहे. गोव्याची हलकी दारु महाराष्ट्रातील ब्रँडेड बाटलीत भरणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेड्या ठोकल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. ज्यात एक स्कोडा कारचा मालक आणि त्याच्या साथीदाराचा त्यात समावेश आहे. त्यांच्याकडून आणखी एक कार व मोबाईल, असा 11 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 26 जून रोजी ही कारवाई केली आहे. महादेव ऊर्फ देवा बाळासाहेब मुटकुळे (रा. मांडावा, ता. आष्टी, जि. बीड) आणि चंद्रकांत काशिनाथ गायकवाड, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुटकुळे हा मुख्य सूत्रधार असून गायकवाड हा स्कोडा कारचा मालक आहे.
अधिक माहिती अशी की, दोन जण गोव्याची स्वस्त दारु महाराष्ट्रातील महागड्या ब्रँडच्या बाटलीत भरुन विदेशी मद्याची तस्करी करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी पथकाने भेंडाळा फाटा शिवारात सापळा लावला होता. तेव्हा दादासाहेब पांडुरंग मुटकुळे (मूळ रा. मांडवा, ता. आष्टी, ह. मु. सिडको वाळूज महानगर-1) आणि दिनेश सखाराम धायडे (रा. घाणेगाव, ता. गंगापूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून स्कोडा कार (एमएच 46, डब्ल्यू 9329) आणि बनावट इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्की 180 मिलिच्या बाटल्यांनी भरलेल्या 676 सीलबंद बाटल्या जप्त केल्या.
असा झाला भांडाफोड!
जप्त केलेल्या स्कोडा कारचा (एमएच 46, डब्ल्यू 9329) मालक चंद्रकांत गायकवाड याला बोलावून राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी केली. तेव्हा ही कार महादेव मुटकुळे याच्या सांगण्यावरून दारुची वाहतूक करण्यासाठी दादासाहेब मुटकुळे याला दिल्याचे समोर आले. त्यावर महादेव मुटकुळेची चौकशी केली असता त्याने दादासाहेब मुटकुळे याला विदेशी दारुची तस्करी करण्यासाठी रिकाम्या बाटल्या, बूच असे साहित्य पुरवल्याचे सांगितले. गायकवाड आणि महादेव मुटकुळे यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यावर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाया थंडावल्या
गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका मागून एक कारवायाचा धडाका लावला होता. विनापरवानगी हॉटेलमध्ये दारु पिणाऱ्यांवर थेट कारवाई करत न्यायालयात हजर करण्यात येत होते. त्यांच्या या कारवायामुळे अवैध दारु विकणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. मात्र या नवीन वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाया थंडावल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: