हद्दच झाली राव! मोबदला घेऊन पुन्हा अतिक्रमण; मग काय, महापालिकेनेही थेट 'जेसीबी' फिरवला
Aurangabad News : अतिक्रमणधारकांना यापूर्वी मोबदला देऊन अतिक्रमण काढण्यात आले होते. पण, त्यांनी पुन्हा अतिक्रमण केले असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Aurangabad News : औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) फटकारल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) मागील काही काळात शहरातील सिडको भागातील अतिक्रमणाविरोधात (Encroachment) कारवाई केली होती. मात्र, मागील काही दिवसांत तुरळक कारवाई होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शहरातील लक्ष्मण चावडी चौक ते कैलास नगर समशान भूमी डीपी रस्त्यावरील 15 अतिक्रमण काढले आहेत. यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अतिक्रमणधारकांना यापूर्वी मोबदला देऊन अतिक्रमण काढण्यात आले होते. पण, त्यांनी पुन्हा अतिक्रमण केले असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत लक्ष्मण चावडी ते पुढील चौकापर्यंत 80 फूट आणि नंतर 60 फूट या डीपी रस्त्यावरील एकूण 15 बाधित मालमत्ता निष्कासित करण्यात आल्या आहे. या बाधित मालमत्ता यापूर्वीही 2012 मध्ये निष्कासित करण्यात आल्या होत्या. तसेच काही नागरिकांना याचा मोबदला सुद्धा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर देखील या लोकांनी रस्ता न झाल्याने पुन्हा अतिक्रमण करुन दुकाने थाटली होती. या रस्त्यावर कैलासनगर स्मशानभूमी असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असल्याने वाहतुकीला नेहमीच अडथळा होत होता. याबाबत मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी नुकतीच या रस्त्याची पाहणी केली होती. तसेच लगेच स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरु झाल्याने मागील आठवड्यात अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त सविता सोनवणे यांनी या रस्त्यावर पूर्ण पाहणी करुन नागरिकांशी चर्चा करुन आपापले अतिक्रमणे काढण्याबाबत सूचना केल्या होत्या.
काही नागरिकांनी स्वतः टपऱ्या वगैरे लोखंडी शेड काढले होते. परंतु माती व कच्या विट कामात झालेले बांधकाम काढले नव्हते. त्यामुळे प्रथम या नागरिकांना पुन्हा एक तासाचा अवधी देऊन त्यांचे दुकानातील मौल्यवान वस्तू व घरातील वापरणे योग्य साहित्य काढून देण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने हे सर्व अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. या अतिक्रमणामध्ये नागरिकांनी मोबाईल दुकान, कटिंगचे दुकान, इलेक्ट्रिक वस्तू रिपेरिंगचे दुकान, भाजी विक्रेते, चिकन, मटणचे दुकान होते. तर काही लोकांनी राहण्यासाठी खोल्या बांधल्या होत्या. इतर काही नागरिकांनी या ठिकाणी बांधकाम करुन भाड्याने दिले होते आणि स्वतः दुसऱ्या ठिकाणी राहत होते.
आजही कारवाई होणार!
सोमवारी लक्ष्मण चावडी ते कैलाश नगर जाताना डाव्या बाजूचे अतिक्रमण काढण्यात आली आहे. तर आज उजव्या बाजूचे अतिक्रमणे बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहे. मनपा आयुक्तांनी या भागातील नागरिकांना व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की, आपण स्वतः हे अतिक्रमणे बांधकामे काढावी. स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या रस्त्यात सहकार्य करावे.
इतर महत्वाच्या बातम्या: