(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संभाजीनगर शहरात मुसळधार पाऊस, 7 वर्षांची चिमुकली वाहून गेली
Rain Update : आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला असून, यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Maharashtra Rain Update : आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला असून, यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान कासमबरी दर्गा मिटमिटा येथे एक सात वर्षांची मुलगी वाहून गेली असून, आता परिश्रमानंतर मुलगी बेशुद्ध अवस्थेत मिळून आली आहे. तर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आलिया मेहबूब पठाण ( वय 7 वर्षे) असे या मुलीचं नाव आहे. तर शहरातील अनेक भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात संध्याकाळी झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचले आहेत. तर एका ठिकाणी झाड पडल्याची, तसेच कटकट गेट येथे नाल्यावरच्या पुलाची भिंत खचल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्राप्त झाली आहे
कोठे काय परिस्थिती?
महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कासम बररी दर्गा येथे ताज पुलाच्या बाजूला नाल्यात एक मुलगी पाहून गेली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे एक पथक घटनास्थळी तात्काळ रवाना झाला आहे.
नंदनवन कॉलनी येथे प्लॉट क्रमांक 72 अंडरग्राउंडमध्ये पाणी तुंबले असून, घटनास्थळी पथक रवाना करण्यात आले आहे.
याशिवाय कालडा कॉर्नर येथे वैष्णवी अपार्टमेंटमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच पेठेनगर प्लॉट क्रमांक 86, उल्कानगरी विठ्ठल रुक्माई मंदिरसमोर पाणी साचले आहे. तर याठिकाणी देखील महानगरपालिका पथक रवाना करण्यात आले आहे. तसेच साचलेले पाणी पंपाच्या मार्फत काढण्यात येत आहे.
तर चिकलठाणा एमआयडीसी भागात एका फर्निचर कंपनीला आग लागल्याची घटनाची माहिती मिळाली आहे. आग विजविण्यासाठी पथक रवाना झाले आहेत.
झोन नंबर 7 मधील उल्कानगरी विठ्ठल रुक्माई मंदिरसमोरील पावसाचे पाणी काढण्यात आले आहे. यावेळी मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते.
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक गुलमोहरच्या झाड रस्त्यावर पडला आहे. याबाबत माहिती मिळताच एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि झाड रस्त्याच्या बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला.
याशिवाय पोलीस कंट्रोल रूम यांच्याकडून मिळालेली सूचनानुसार जिल्हा परिषद मैदान विसर्जन विहिरीच्या बाजूच्या नाल्यामध्ये एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे मृतदेह काढण्यासाठी अग्निशमन दलाचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.