चंद्रपूर : चंद्रपुरात आज तिरंगा यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचा पुगलिया गट आणि भाजप एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळाले. भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर शहरातील गांधी चौकात 1500 फूट तिरंगा रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीच्या निमित्ताने काँग्रेस-भाजपचे दोन दिग्गज ध्रुव एकत्र आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुगलिया-मुनगंटीवार यांची जवळीक काँग्रेस साठी धोक्याची घंटा ठरू शकते.


माजी खासदार नरेश पुगलिया हे विदर्भातील काँग्रेसचं मोठं प्रस्थ असून ते लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा या तिन्ही सदनाचे सदस्य राहिले आहे. दिल्ली हायकमांड सोबत अतिशय जवळचे संबंध असल्याने राज्यातील काँग्रेस नेते नेहमी त्यांना घाबरून असतात. मात्र गेल्या काही वर्षात प्रदेश काँग्रेस कडून पध्दतशीरपणे जिल्ह्यातील पुगलिया यांच्या विरोधकांना महत्व देऊन पुगलिया यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुगलिया यांनी देखील वडेट्टीवार-धानोरकर यांच्या कुठल्याच कार्यक्रमात न जाता स्वतःची समांतर काँग्रेस जिवंत ठेवली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, गडचांदूर आणि राजुरा शहरात त्यांना नेता मानणारा काँग्रेसचा एक मोठा वर्ग आहे. याशिवाय चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील त्यांना मानणारा मोठा कार्यकर्ता वर्ग आहे.


काही दिवसांपूर्वी नरेश पुगलिया यांनी आयोजित केलेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली होती आणि या कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी आगामी लोकसभा चंद्रपूरातून लढविण्याची इच्छा व्यक्त करत पुगलिया यांना आशीर्वाद मागितला होता. पुगलिया यांनी देखील त्यांच्या या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तेव्हापासूनच पुगलिया हे पक्षांतर्गत विरोधकांना धडा शिकविण्यासाठी मोठी खेळी करू शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत नरेश पुगलिया काय करतात या कडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :