Chandrakant Patil On His Portfolios : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून काल मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. खाते वाटपानंतर यामध्ये बंडखोर गटाची अवस्था सांगता येत नाही अन् बोलताही येत नाही, अशीच झाली असली, तरी भाजपमध्ये दिग्गजांना महत्त्वाच्या खात्यांपासून वंचित ठेवल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. 


चंद्रकांत पाटील यांचा शपथविधी झाल्यानंतर तातडीने त्यांच्याकडील भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले. त्यानंतर खाते वाटपातही त्यांना शिवसेनेकडील उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचा कारभार मिळाला आहे. त्याबरोबर संसदीय कार्य आणि वस्त्रोद्योग खात्याचा जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचेही महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु झाला असल्याची चर्चा रंगली आहे. आता यावरून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


कोणतेही खातं छोटे मोठं नसतं


ते पुढे म्हणाले की, अतिशय उत्तम खात मिळालं आहे. कोणतेही खातं छोटे मोठं नसतं. तसेच एक नंबर आणि दोन नंबरही नसतं. संघटना काम पाहत असते, त्यानुसार जबाबदारी मिळत जाते. उद्या माझ्या विभागातील सेक्रेटरींची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आधीच्या सरकारने काय चुकीचं केलं, बरं केलं हे पाहणारा मी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. बऱ्याला बरं म्हणणारा माणूस असल्याचेही त्यांनी नमूद केले. 


अनुदान लाटण्यासाठी सूतगिरण्या झाल्या असतील तर त्याची चौकशी होईल


शिवाजी विद्यापीठाला मंजूर केलेला निधी दिला नाही. साखर कारखान्यांच्या बरोबरीने रोजगार निर्माण करणार वस्त्रोद्योग हे क्षेत्र आहे. वस्त्रोद्योगाला सोलरवर कसं नेता येईल? यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. अनुदान लाटण्यासाठी सूतगिरण्या झाल्या असतील तर त्याची चौकशी होईल, असा इशाराही त्यांनी दिला. 


कोणीही काळजी करू नये


दरम्यान, खातेवाटपावरून सामनामध्ये झालेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. 2014 ते 2019 युतीच्या काळातही सामना टीका करत होता आता तर विरोधक झाल्याचा टोला त्यांनी लगावला. विरोधकांनी टीका करायची असते, चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं पण तसे काही होत नसल्याचे ते म्हणाले. नाराजी संपवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत कोणीही काळजी करू नये असाही टोला त्यांनी लगावला. 


देशाचे नवीन शैक्षणिक धोरण मोदींनी आणलं आहे. त्याच्या अंमलबजावणीत करण्यासाठी शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण महत्त्वाचा आहे. देशाला चांगले इंजिनियर आहे तयार करावे लागतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या