बुलढाणा : जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी या घटनेचा निषेध केला आहे. जनावरांनाही असं कोणी मारत नाही, क्रूरतेने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आहे. ही घटना निंदनीय असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले.
बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले की, जालना येथील मराठा आंदोलकावर केलेला लाठीचार्ज निंदनीय आहे. जनावरांना सुद्धा अस कोणी मारत नाही, असा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या घटनेचे आम्ही समर्थन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. बुलढाणा जिल्ह्यच्या दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले. या लाठीचार्जची चौकशी करून लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईची मागणीदेखील करणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले.
मराठा आरक्षण हे कोर्टात अडकले आहेत. मराठा समाजाचा संयम तुटत चालला आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री कार्यकाळाच्या आतच मराठा आरक्षणावर कायम तोडगा काढण्याचा निर्णय घ्यावा अशी आग्रहाची मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आंदोलकांना शांततेचे आवाहन
आमदार गायकवाड यांनी मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले आहे. शासनाचे नुकसान करून आपल्याला आरक्षण मिळणार नाही. लोकांना त्रास देऊनही काही मिळणार नाही, ज्यावेळी हा विषय कोर्टाच्या बाहेर येईल आणि शासन काही करणार नाही त्यावेळी तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही देखील आक्रमकपणे पुढाकार घेऊन पुढे राहू असेही त्यांनी म्हटले. सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाजाची सरकारकडून फसवणूक
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाजाची फसवणूक सुरू आहे. 50 टक्क्यांची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही, हे सगळ्यांना माहिती होते. मात्र, ही बाब माहिती असूनही सरकारने खोटं आश्वासन दिले. पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी म्हटले. मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्यांना मराठा समाज नक्कीच धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.