(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अन्य सात जणांवर कारवाई
शिवसेनेच्या 12 खासदाररांनी लोकसभा सभापतींना पत्र देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता खासदार प्रतापराव जाधवांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
बुलढाणा : बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही कारवाई झाली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे आणखी सात जणांवर कारवाई झाल आहे. 19 जुलैला शिवसेनेच्या 12 खासदाररांनी लोकसभा सभापतींना पत्र देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता खासदार प्रतापराव जाधवांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून खासदार प्रतापराव जाधव यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवेसना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. या बाबतचे वृत्त आज रविवार 24 जुलै 2022 रोजी शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मंगळवार (19 जुलै) शिवसेनेच्या 12 खासदाररांनी गट तयार करून 12 खासदारांचे पत्र लोकसभा सभापतींना देऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. काही शिवसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांनी आम्ही खासदार प्रतापराव जाधव यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते. सामना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तर जिल्हा प्रमुख शांताराम दाणे (मलकापूर जळगांव जामोद विधानसभा) उपजिल्हा प्रमुख राजु मिरगे, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख नांदुरा संतोष डीवरे, तालुका प्रमुख मलकापूर विजय साठे, तालुका प्रमुख शेगांव रामा थारकार यांची पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे.