Buldana Rain : बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, भोगावती नदीवरचा पूल दुसऱ्यांदा गेला वाहून, वाहतूक ठप्प
बुलढाणा जिल्ह्यात मुळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं साखरखेर्डा येथील भोगावती नदीवरील पूल वाहून गेला आहे.
Buldana Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळं शेतीकामांना वेग आला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात मुळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं साखरखेर्डा येथील भोगावती नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
खामगाव-साखरखेर्डा-सिंदखेडराजा हा मार्ग पूर्णतः ठप्प
बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर चिखली, मेहकर, खामगाव, शेगाव, नांदुरा या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक नदी नाल्यांना पूर आला. तर तीन दिवसांपूर्वी साखरखेरडा येथील भोगावती नदीवरील तात्पुरता पूल वाहून गेला होता. संबंधित ठेकेदारानं तो दुरुस्त करुन वाहतूक सुरुही झाली होती. पण रात्री या परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं हा पूल पुन्हा वाहून गेल्यानं वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. यामुळं आता खामगाव-साखरखेर्डा-सिंदखेडराजा हा मार्ग पूर्णतः ठप्प झाला आहे. सध्या खरीप हंगामाची सुरुवात असल्यानं शेतकऱ्यांना बियाणं, खते या मार्गावरून नेण्यास अडचण निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील इतरही तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं शेतकरी मात्र सुखावला आहे.
राज्याच्या विविध भागात मान्सूनचं आगमन
राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अद्यापही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नाही. दरम्यान, निम्म्या महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालं आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, सांगली, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं लवकरच खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे.
18 जूनपासून पावसाचा वेग वाढणार
दरम्यान, सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, 18 जून 2022 पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.